संजय राऊत यांनी देशाची नव्हे, महाराष्ट्राची काळजी करावी; प्रविण दरेकरांचा टोला

मुंबई नगरी टीम

मुंबई । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सक्षम आणि धाडसी आहेत.त्यामुळे संजय राऊत यांनी देशाची काळजी करू नये.त्यांनी महाराष्ट्राची काळजी करावी,असा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी मारला.

संजय राऊत यांनी श्रीलंकेत जसे पंतप्रधान आणि राष्ट्रपती पळून गेले तशी परिस्थिती भारतात येण्यास वेळ लागणार नाही,असे वक्तव्य केले आहे. त्यावर बोलताना दरेकर यांनी राऊत यांचा समाचार घेतला.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रातील सरकार सक्षम आहे.आपल्या दारात काय बांधलेय हे जरा संजय राऊत यांनी पाहावे.केवळ वक्तव्य करण्यापेक्षा महाराष्ट्राची आर्थिक स्थिती काय आहे, महाराष्ट्र कोणत्या अडचणीत आहे, महाराष्ट्राचे विकासाचे प्रश्न काय आहेत, यावर बोलावे. महाराष्ट्रातील प्रकल्प अर्धवट का राहिलेत यावर कधी संजय राऊत बोलल्याचे आठवत नाही, असेही दरेकर म्हणाले. संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील स्थितीचे आकलन करावे, अभ्यास करावा, त्यावर काय उपाययोजना करता येतात का यावर चर्चा करावी. महाविकास आघाडी सरकारला त्याबाबत सांगावे. देशाची काळजी करू नये. केंद्रातील भाजपचे सरकारही भक्कम आहे. महाराष्ट्रात दोलायमान असलेले अळवावरच्या पाण्यावरचे सरकार सध्या सत्तेवर आहे त्यामुळे आधी येथील काळजी त्यांनी करावी, असा टोलाही दरेकर यांनी मारला.

Previous articleराज्यसभेसाठी १० जूनला मतदान; छ.संभाजीराजेंच्या घोषणेमुळे निवडणुकीत चुरस
Next articleमग भाजपने बोलावं का नाना पटोले यांनी पाठीत खंजीर खुपसला ; अजित पवारांनी सुनावले