मुंबई नगरी टीम
मुंबई । गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढून विजयी झालेले व पराभूत झालेल्या उमेदवारांची महत्वपूर्ण बैठक राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली येत्या बुधवार सकाळी ९ वाजता आयोजित करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
राष्ट्रवादीच्या आजी-माजी आमदारांची बैठकीत यापूर्वीच घेण्यात येणार होती मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव ही बैठक होवू शकली नाही. आता ही बैठक येत्या बुधवार सकाळी ९ वाजता शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे होणार आहे.या बैठकीत विजयी व पराभूत झालेल्या मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे असेही मलिक यांनी सांगितले.
कोरोना परिस्थिती नियंत्रणात आल्यावर राज्यातील मुदत संपलेल्या महानगरपालिकांच्या निवडणुका होतील परंतु ज्यांना राज्य सरकार हे जाणूनबुजून करतंय असं वाटतंय त्यांनी विविध हायकोर्टाचे आदेश आलेत त्याचा अभ्यास करावा असा टोला मलिक यांनी नाव न घेता राज ठाकरे यांना लगावला आहे.राज्यात काही महानगरपालिकांच्या मुदत संपल्यावर कोरोनामुळे निवडणूका घेता आल्या नाहीत तिथे प्रशासक नेमण्यात आले आहेत. कोरोना असताना नेमणूकांबाबत हे सरकार जाणूनबुजून कुठेही प्रशासक नेमण्याच्या मनस्थितीत नाही असेही मलिक यांनी स्पष्ट केले. जेव्हा पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूच्या निवडणूका झाल्या त्यावेळी कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर विविध न्यायालयाने राजकीय पक्षांवर बोट ठेवण्याचे काम केले. मुळात याप्रकरणी निवडणूक आयोगाला जबाबदार धरले पाहिजे होते असेही मलिक म्हणाले.सरकारला प्रशासकाच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्था चालल्या पाहिजे यामध्ये रस नाही. लोकशाहीत निवडून आलेल्या लोकांनी कामकाज केले पाहिजे परंतु कोरोनामुळे ही परिस्थिती आल्याचे मलिक यांनी स्पष्ट केले.