मुंबई नगरी टीम
मुंबई । मुख्यमंत्री केवळ भावनिक आवाहन करत,दिवस ढकलण्याचं काम करत आहेत. जनतेला नियम पाळण्याचे आवाहन करताना महाविकास आघाडी पक्षातील नेते,कार्यकर्ते नियम पाळत आहेत का ? असा सवाल करत जर सत्तेतील नेतेच कोरोनाचे नियम धाब्यावर बसवणार असतील तर मुख्यमंत्र्यांनी जनतेकडून कोणती अपेक्षा करायची अशी टीका आज विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केली.
कोरोना संसर्गात थोडीशी वाढ दिसत असून मागील लाटेचा अनुभव लक्षात घेता, मुख्यमंत्र्यांनी राजकीय पक्ष आणि संघटनांना विनंती करत,गर्दी होणारे राजकीय कार्यक्रम, सभा, मोर्चे त्वरित स्थगित करण्याचे आवाहन केले आहे, त्यावर बोलताना दरेकर म्हणाले, पुण्याच्या जुन्नर आणि मंचरमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह विविध मंत्र्यांच्या उपस्थित गर्दीमध्ये कार्यक्रम व मेळावे झाले. तसेच दोन दिवस आधी याच तालुक्यात आळे फाटा पोलिसांच्या हद्दीत शिवसेना खासदार संजय राऊत आले असून त्यांच्याही कार्यक्रमात गर्दी उसळली होती. त्याचबरोबर युवा सेनेचेही मेळावे झाले. मग तेव्हा आपले नियम कुठे गेले ? त्यामुळे नियम सांगत असताना मुख्यमंत्र्यांनी “चॅरिटी बिगिन अॅट होम” यांचा अर्थ जाणून घ्यावा असा टोलाही दरेकर यांनी यावेळी लगावला.
मुख्यमंत्र्यांनी राज्याचे पालकतत्वाच्या भूमिकेतून जनेताला उद्देश करण्यापेक्षा आपला पक्ष आपल्या सत्तेतील लोकांनी नियम पाळावे याकडे लक्ष दिले पाहिजे, तरचं लोकं आपल्या आवाहनाला प्रतिसाद देतील असा टोला लगावत दरेकर म्हणाले, राज्यातील जनतेसाठी सण महत्वाचे आहेत. त्यामुळे नियम पाळून काळजी घेऊन मध्यम मार्ग काढण्याची आवश्यकता आहे. सरसकट भावनिक आवाहन करणं योग्य नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.