१२ आमदारांच्या नावांना आणि विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीला मंजुरी द्या !

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणावेळी झालेल्या अभूतपूर्व गोंधळाच्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली.या भेटीत विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त १२ आमदार तसेच विधानसभा अध्यक्ष निवडणुकीस मंजुरी द्यावी अशी विनंती केल्याचे शिष्टमंडळातील नेत्यांनी सांगितले.

विधानभवनात आज झालेल्या गोंधळानंतर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात मंत्री एकनाथ शिंदे,जयंत पाटील, अशोक चव्हाण, छगन भुजबळ, अनिल परब, नाना पटोले, सतेज पाटील यांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. राज्यपाल यांच्याशी अर्धा तासापेक्षा अधिक वेळ शिष्टमंडळाची बैठक चालली.अभिभाषणावेळी झालेल्या गोंधळाचे विसरुन जा आणि १२ आमदार आणि अध्यक्षपदाची निवडणूक याच्या फाईली मंजूर करा, अशी विनंती आम्ही राज्यपालांना केली, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.भाजपला विधानसभा अध्यक्ष निवडणूक होऊ द्यायची नाही, असा आरोप अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केला.विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या विषयावर राज्यपालांशी चर्चा झाली. विधानसभा अध्यक्ष निवडणुकीसाठी परवानगी मिळावी ही विनंती राज्यपालांकडे केल्याची माहिती शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ९ मार्च रोजी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी परवानगी मागितली. ती तारीख सोयीची वाटते. राज्यपाल याबाबत कळवतील, असे शिंदे यांनी सांगितले.

Previous articleमहाविकास आघाडी सरकारने ओबीसी आरक्षणाची हत्या केली ; दरेकरांचा हल्लाबोल
Next article“मी खोटं बोलत असेल तर इथेच फाशी द्या”; अपक्ष आमदाराचे विधानसभेत विधान