मुंबई नगरी टीम
मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी केलेल्या एका विधानावरून राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सावध भूमिका घेतली आहे तर एकोकाळचा शिवसेनेचा मित्र पक्ष असलेल्या भाजपमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
काल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मला माजी मंत्री म्हणू नका,दोन तीन दिवसांत कळेल, असे म्हणत राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली असतानाच आज औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विधानामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे.या कार्यक्रमात यावेळी व्यासपीठावर केंद्रीय मंत्री आणि भाजपा खासदार रावसाहेब दानवे आणि केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड हे देखील उपस्थित होते.मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात करताना व्यासपीठावरच्या उपस्थित मान्यवरांना संबोधताना “व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे आजी-माझी आणि एकत्र आले तर भावी सहकारी”, असा उल्लेख केला त्यांच्या या वक्तव्यामुळे अनेक तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.भविष्यात शिवसेना आणि भाजपा एकत्र येणार असल्याची चर्चा यावरून सुरू झाली आहे. राजकारणात कधी काहीही होते. आम्ही एक सक्षम विरोधी पक्षाची भूमिका पार पाडत आहोत.राज्यात अनैसर्गिक आघाडी तयार झाली आहे,ती फार काळ टीकणार नाही,हे मुख्यमंत्र्यांच्या देखील लक्षात आले असेल. म्हणून मुख्यमंत्री यांनी मनातली भावना बोलून दाखवली अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपण भावी सहकारी होऊ असे जे वक्तव्य केले आहे त्यासाठी आमच्या शुभेच्छाच आहेत. आम्हाला नाक मुरडण्याचे काहीच कारण नाही अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे. किंवा यातून मुख्यमंत्र्यांना सरकारमधील घटक पक्षांना इशारा द्यायचा असेल की, तुम्ही शिस्तीत वागा नाहीतर मी भाजपासोबत चाललो. त्यामुळे हे दबावतंत्र देखील असू शकते असेही दरेकर म्हणाले.मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावर केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मनातलं ओळखायला मी ज्योतिषी नाही असे ते म्हणाले आहेत.मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख आहेत.प्रत्येकाला काय बोलायचे तो त्यांचा अधिकार आहे. त्यांच्या मनात काय आहे हे मी सांगू शकत नाही. माझ्याशी बोलताना ते नेहमी राज्याला प्रगतीवर नेण्याविषयी बोलत असतात, अशी सावध प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही सावध प्रतिक्रिया दिली आहे.मुख्यमंत्र्यांना असे विनोद करायची सवय असून, भाजप सध्या तणावात आहे, म्हणून त्यांच्या समाधानासाठी मुख्यमंत्री बोलले असतील.ते कोणत्या अर्थाने बोलले हे फक्त मुख्यमंत्रीच सांगू शकतील. आम्ही सत्तेत आनंदाने आलो नाही तर केवळ भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचे होते म्हणून आम्ही सरकारमध्ये सहभागी झालो आहोत असे पटोले म्हणाले.