मुख्यमंत्र्यांचे सहाय्यक मिलींद नार्वेकर तिरुपतीच्या समितीवर

मुंबई नगरी टीम

मुंबई । देशातील सर्वाधिक लोकप्रिय आणि श्रीमंत देवस्थान तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यांची यादी बुधवारी आंध्र प्रदेश सरकारने जाहीर केली. या यादीत देशभरातून २४ व्यक्तींची नियुक्ती केली असून महाराष्ट्रातून या यादीत शिवसेना सचिव व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांची सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आली आहे.

तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्ट हे जगातील दुसरा श्रीमंत धार्मिक ट्रस्ट आहे. तिरुपती व्यंकेटेश्वर मंदिराचे व्यवस्थापन पाहण्याचे काम या ट्रस्टकडे आहे. तिरुपतीमध्येच तिरुमला तिरुपती देवस्थानचे कार्यालय असून तेथे १६ हजार कर्मचारी काम करतात.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री व वायएसआर काँग्रेसचे प्रमुख वाय एस जगनमोहन रेड्डी यांच्याशी फोनवरुन संवाद साधला होता. त्यानंतर महाराष्ट्रातून मिलिंद नार्वेकर यांची नियुक्ती झाली आहे.आंध्र प्रदेश सरकारने त्याबाबत अधिसूचना काढत तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यांच्या नावांची यादी जाहीर केली. शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर हे मुंबई क्रिकेट संघटनेच्या मुंबई प्रीमिअर लीग गव्हर्निंग कौन्सिलच्या अध्यक्षपदी आहेत.

Previous articleपुणे महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू
Next articleमुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी “दक्ष” तर भाजपात आनंदाचे वातावरण