विकासकामातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची विरोधकांना चपराक : सामंत यांचा विरोधकांना टोला

मुंबई नगरी टीम

मुंबई । कोरोनाच्या पूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा केला होता.यावेळी झालेल्या आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांनी चिपी विमानतळ सुरू करण्याची आणि सिंधुदुर्गमध्ये वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची भूमिका घेतली होती.हे आश्वासन पूर्ण करून मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना विकासकामातून चपराक दिली असल्याचा टोला राज्याचे उच्च व शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी विरोधकांना लगावला आहे.नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ सुरू करण्यास परवानगी दिली आहे,असल्याची माहितीही सामंत यांनी दिली.

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री आणि पालकमंत्री सामंत म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन वर्षांपूर्वी कोकण दौऱ्यावर असताना चिपी विमानतळ सुरू करण्याचा शब्द कोकणवासियांना दिला होता. कोरोनाकाळात सुद्धा विकास कामाला गती देऊन मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिलेल्या शब्दाची वचनपूर्ती केली आहे.सिंधुदुर्गवासीयांचे अनेक वर्षांचे स्वप्न या शासनाने प्रत्यक्षात उतरवले आहे. येत्या ९ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिपी विमानतळाचा लोकार्पण सोहळा होणार आहे, असेही सामंत यांनी यावेळी सांगितले.मुख्यमंत्र्यांनी चिपी विमानतळ सुरू करण्याचे आणि सिंधुदुर्गमध्ये वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचे आश्वासन दिले होते.ते पूर्ण करून त्यांनी विरोधकांना चपराक दिली असा टोलाही त्यांनी विरोधकांना यावेळी लगावला.तसेच चिपी विमानतळास बॅ.नाथ पै यांचे नाव देण्याची मागणी करण्यासाठी भेटणार असल्याचेही सामंत यांनी यावेळी सांगितले.

तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारणीसाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली असून १०० विद्यार्थी क्षमतेच्या या महाविद्यालयाशी संलग्नित ५०० खाटांचे सुसज्ज रुग्णालय उभारण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाची २० एकर जागा वैद्यकीय शिक्षण विभागास देण्यात आली आहे. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग नवी दिल्ली यांचेकडून वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रथम वर्ष एम.बी.बी.एस. अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्याकरिता यावर्षी मान्यता मिळाली आहे. या महाविद्यालयामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला नक्कीच चालना मिळेल,असेही सामंत यांनी पत्रकारपरिषदेत सांगितले.

Previous articleचंद्रकांत पाटील हे आरोपामागचे मास्टरमाईंड ; हसन मुश्रीफ यांचा आरोप
Next articleराज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खरमरीत उत्तर