मुंबई नगरी टीम
पुणे । आगामी महानगरपालिकांच्या निवडणूकीच्या तोंडावर सर्वच पक्षांचे नेते आक्रमक झाल्याचे पाहवयास मिळत आहे.राष्ट्रवादीच्या प्रचार सभा गाजविणारे राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पंतप्रधान तर अजित पवारांना मुख्यमंत्री करण्यासाठी कार्यकर्त्यांनी झपाटून कामाला लागणे गरजेचे असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.त्यांच्या या आवाहनामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांच्या नेत्यांनी दंड थोपटण्यास सुरूवात केल्याचे चित्र आहे.शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी येथे केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती.आता राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी केलेल्या आवाहनामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.भोसरी येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात खासदार कोल्हे यांनी जोरदार फटकेबाजी करीत कार्यकर्त्यांना नकळत कानपिचक्या दिल्या आहेत.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पंतप्रधान तर अजित पवारांना मुख्यमंत्री करण्यासाठी कार्यकर्त्यांनी झपाटून कामाला लागा असे आवाहन त्यांनी या मेळाव्यात केले आहे.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे येथिल निवडणूकीत लक्ष घालणार आहे.त्या पार्श्वभूमीवर खासदार कोल्हे यांनी हे आवाहन केले आहे.शरद पवार यांना पंतप्रधान या सर्वोच्च पदावर बसलेले पहायचे असेल तर त्यांना पिंपरी चिंचवड सारख्या शहरात लक्ष घालावयास लागू नये अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
येथिल स्थानिक नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पिंपरी चिंचवड मध्ये लक्ष घालण्याची विनंती केली होती. त्यानुसार शरद पवार हे येत्या १३ ऑक्टोबरला माजी नगरसेवक आणि पदाधिका-यांची बैठक घेणार आहेत तर १६ तारखेला कार्यकर्त्यांचा आणि पदाधिका-यांचा मेळावा घेणार आहेत.या पार्श्वभूमीवर खासदार कोल्हे यांनी येथिल स्थानिक नेत्यांना कानपिचक्या दिल्या आहेत.उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्री करायचे असेल तर स्थानिक नेत्यांनी त्यांच्याकडून अपेक्षा न ठेवता येथिल ताकत वाढवली पाहिजे, असा आदेश वजा इशारा त्यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.शिवसेनेसह,राष्ट्रवादीने पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने सत्ताधारी भाजपसमोर मोठे आव्हान निर्माण झाल्याची चर्चा आहे.