मुंबई नगरी टीम
मुंबई । नवाब मलिक राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत की वक्ते आहेत हे माहित नाही,नवाब मलिक यांच्या जावयाला अटक झाल्यानंतर मलिक यांची बहुतेक जनमानसात बदनामी झाली असावी, त्याची त्यांना मळमळ असावी, त्यामुळेच ते दर दिवशी प्रसिध्दी माध्यमांच्या माध्यमांतून केवळ सूडभावनेने तपास यंत्रणाविरुध्द वक्तव्ये करत असल्याची टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज केली.तसेच एनसीबीने केलेली कारवाई चुकीची असल्याचा दावा ते जहिरपणे करीत असून जे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे त्यावर अश्या प्रकारचे भाष्य करणे चुकीचे असल्याचे मत दरेकर यांनी व्यक्त केले.
एनसीबीने केलेली कारवाई चुकीची आहे, ते अमली पदार्थ नव्हते. तसेच एनसीबीकडून चुकीच्या पद्धतीने आपल्या जावयांवर कारवाई होत असल्याचा आरोप मलिक यांनी केला. त्याबाबत प्रसार माध्यमांशी बोलताना दरेकर यांनी सांगितले की, नवाब मलिक म्हणतात, तपास करण्यासाठी केंद्र सरकारची समंती पाहिजे, चौकशीसाठी आयोग पाहिजे, परंतु ही मागणी करण्यासाठी त्यांना कोणी अडवलं आहे, आपल्याच राज्य सरकरच्यावतीने तशी केंद्र सरकारकडे मागणी करावी. त्यानुसार केंद्र सरकार आवश्यक उपाययोजना, तपास समिति जे काही आवश्यक असेल ते निश्चितचं गठित करेल. तुम्ही सत्ताधारी पक्षाचे मंत्री आहेत. त्यामुळे ज्या काही गोष्टी असतील तर त्या सरकारला कायदेशीर पध्दतीने करता येतील. परंतु एनसीबीची कारवाई चुकीची आहे असे प्रसार माध्यमाच्या माध्यमातून सतत बिंबवण्याचा मलिक यांचा केविलवाणा प्रयत्न सुरू असल्याची टीका दरेकर यांनी केली.नवाब मलिक यांच्या जावयाला ८ दिवस तुरुंगात रहावं लागलं, जर एनसीबी चुकीच्या पद्धतीने काम करत आहे असे वक्तव्य केले नाही तर मलिक यांच्या जावयाची अटक योग्य होती व भविष्यात आपल्या जावयाला वेगवेगळ्या कारवायांना सामोरे जावे लागेल या भीतीपोटी ते तपास यंत्रणाना कोंडीत पकडायचं आणि त्यांच्यावर दबाव तंत्राचा वापर करण्याची खेळी मलिक करीत आहेत. परंतु तपास यंत्रणा अशा प्रकारच्या दबावाला जुमानत नाहीत. कायद्याच्या चौकटीत न्यायव्यवस्थेच्या सूचना आणि मार्गदर्शनानुसार तपास यंत्रणा आपले काम करतात.
देशामध्ये घटनेने विविध प्रकारच्या यंत्रणा स्थापित केल्या आहे. त्या स्तरावर अन्याय झाला तर वरच्या स्तरावर आपण न्याय मागू शकतो. तसेच वेगवेगळ्या कारवाई बाबत सुप्रीम कोर्टापर्यंतही दाद मागता येईल. जे निष्पाप असतील असे ज्यांना वाटलं असेल ते न्यायव्यवस्थेकडे दाद मागू शकतात. मलिक यांचे आरोप म्हणजे न्यायव्यवस्थेवर टीका करण्यासारखे आहे व न्यायव्यवस्थेचं मनोबल खच्चीकरण करण्याचा प्रकार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कोणाला टार्गेट करायचं काही कारण नाही. अन्य लोकांचेही तपास सुरू आहेत. परंतु ते अशाप्रकरे प्रतिक्रिया देत नाहीत. तसेच एनसीबी कोणाची बाजू घेत नाही. अंमली पदार्थ तरुण पिढीला उद्ध्वस्त करत आहे. आपण अंमली पदार्थ तस्करी करणा-यांच्या बाजूने उभं राहायचं की अमली पदार्थ विरोधी तक्रार करणाऱ्यांच्या विरोधात बोलायचं यावर विचार करण्याची आवश्यकता आहे. संबंधित आरोपी असतील तर ते न्यायव्यवस्थेकडे न्याय मागतील परंतु आपण न्यायव्यवस्थेवर तसेच तपास यंत्रणेवर अविश्वास दाखवायचा हे खेदजनक असल्याचेही त्यांनी सांगितले.
नवाब मलिक यांच्या सुरक्षेत वाढ केल्यासंदर्भात बोलताना दरेकर म्हणाले मलिक ज्या पद्धतीने एनसीबीच्या तपास यंत्रणेबाबत बेताल वक्तव्य करत आहे, त्यामुळेच त्यांना स्वतःला अनसिक्युअर्ड वाटत असेल किंवा त्यांचं मनोबल सिक्युअर्ड करण्यासाठी सुरक्षा व्यवस्था वाढवली असेल. परंतु राज्यात सध्या ज्या ठिकाणी सुरक्षेची जास्त आवश्यकता आहे तिथे सरकार मात्र दुर्लक्ष करत आहे. पण ज्यांच्या व्यक्तव्यातून सामाजिक वातावरण असुरक्षित होतं त्यांची मात्र सुरक्षा वाढविण्याचे काम सरकार करत असल्याची टीकाही दरेकर यांनी यावेळी केली.