एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ;अधिकाऱ्यांना ५ हजार तर कर्मचाऱ्यांना २५०० दिवाळी भेट

मुंबई नगरी टीम

मुंबई । दिवाळी पूर्वी थकीत महागाई भत्ता आणि ऑक्टोबर महिन्याचे वेतन देण्याची मागणी करीत महाराष्ट्र एसटी कर्मचारी संघटनेने संपाचा इशारा दिला होता.या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने एसटी महामंडळाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ५ टक्के वाढ करण्याचा आणि प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेला होणार पगार यंदा मात्र नोव्हेंबरच्या १ तारखेला म्हणजे दिवाळीपूर्वी करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली.

एसटी महामंडळाने १२ टक्यानंतर आजपर्यंत महागाई भत्त्यामध्ये वाढ केलेली नाही त्यामुळे दिवाळी पूर्वी थकीत महागाई भत्ता आणि ऑक्टोबर महिन्याचे वेतन देण्यात यावे अन्यथा संपावर जाण्याचा इशारा एसटी कर्मचारी संघटनेने दिला होता. या पार्श्वभूमीवर आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.दिवाळीच्या पार्श्वभूमिवर एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ५ टक्के वाढ करण्यात आली असून दिवाळीची भेट म्हणून अधिकाऱ्यांना ५ हजार रूपये तर कर्मचाऱ्यांना २५०० रूपये देण्यात येणार असल्याची घोषणा परिवहनमंत्री अनिल परब यांनी केली.या निर्णयाचा लाभ महामंडळाच्या सुमारे ९३ हजारांहून अधिक कर्मचारी-अधिकाऱ्यांना होणार आहे.विशेष म्हणजे प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेला होणार पगार यंदा मात्र नोव्हेंबरच्या १ तारखेला म्हणजे दिवाळीपूर्वी होणार आहे.महागाई भत्त्यात वाढ करावी, अशी कर्मचाऱ्यांची मागणी होती.या मागणीला परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी सकारात्मक प्रतिसाद देत महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला. सध्या कर्मचाऱ्यांना १२ टक्के महागाई भत्ता मिळत आहे, त्यात आणखी ५ टक्के वाढ करण्याचा निर्णय मंत्री परब यांनी घेतला. त्यामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता १७ टक्के होणार आहे.

Previous articleआर्यन खानला जामीन मिळताच नवाब मलिकांचा समीर वानखेडेंवर खळबळजनक आरोप
Next articleभाजपाने आंबेडकरी चळवळीला नक्षलवादी ठरवून बदनाम केले : नाना पटोले