भाजपाने आंबेडकरी चळवळीला नक्षलवादी ठरवून बदनाम केले : नाना पटोले

मुंबई नगरी टीम

मुंबई । केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आल्यापासून वंचित, दलित, शोषित समाज घटकांवरचे अत्याचार वाढले आहेत. या मनुवादी विचाराच्या सरकारने आंबेडकरी चळवळीला नक्षलवादी चळवळ ठरवून बदनाम करण्याचे पाप केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार व आंबेडकरी चळवळ संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या या व्यवस्थेला त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

टिळक भवन येथे पार पडलेल्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांच्या पदग्रहण सोहळ्यात ते बोलत होते.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वंचित समाज घटकाला मुख्य प्रवाहात आणले. देश बाबासाहेबांच्या संविधानावर चालतो पण हे संविधानच बदलण्याचे काम सुरु आहे. सर्व काही खाजगीकरण करुन आरक्षण संपुष्टात आणले जात आहे. शेतकरी, कामगार, तरुण वर्गाला संपवण्याचे काम केले जात आहे. बाबासाहेबांचा विचार टिकला तरच देश वाचेल त्यासाठी आंबेडकरांचा विचार, काँग्रेसचा विचार तळागाळापर्यंत पोहचवा. देशात परिवर्तन घडेल तर ते महाराष्ट्रातूनच आणि हे परिवर्तन घडवण्यासाठी जोमाने काम करा, असे आवाहन पटोले यांनी केले.

यावेळी बोलताना मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले की, काम करणाऱ्या कार्यकर्त्याला काँग्रेसमध्ये संधी मिळेत हेच सिद्धार्थ यांना मिळालेल्या जबाबदारीने पुन्हा दाखवून दिलं आहे. काँग्रेसच्या पाठीमागे दलितांचे संघटन उभे करा. काँग्रेसला सर्वात जास्त ताकद देणारं राज्य म्हणून महाराष्ट्र पुढे आले पाहिजे. त्यासाठी संघटन वाढवा आणि संघटन वाढवण्यासाठी संपर्क,समर्पण, संवाद, साधना, समन्वय या पाच घटकांवर भर द्या.शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यावेळी म्हणाल्या, काँग्रेस पक्ष नेहमीच सामान्य लोकांच्या पाठीशी उभा राहणारा पक्ष आहे, संविधान व लोकशाहीला माननारा पक्ष आहे. काँग्रेसने सामाजिक न्यायाची भूमिका कायम घेतली आहे म्हणूनच सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्यालाही मोठी संधी काँग्रेसमध्ये दिली जाते. कार्यकर्ता चांगले काम करत असेल, निष्ठावान असेल तर पक्ष त्याची नक्की दखल घेते त्याचेच उदाहरण सिद्धार्थ हत्तीअंबिरे आहे. काँग्रेसचा विचार, बाबासाहेबांचा विचार घेऊन काम करत रहा, असे आवाहनही त्यांनी केले.

Previous articleएसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ;अधिकाऱ्यांना ५ हजार तर कर्मचाऱ्यांना २५०० दिवाळी भेट
Next articleराज्यातील वृद्ध साहित्यिक व कलावंतांना दिवाळीपूर्वी सर्व मानधन मिळणार