मुंबई नगरी टीम
मुंबई । मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गंभीर आरोप केलेले आणि ईडीने बेनामी संपत्ती प्रकरणी अटक केलेले राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांचा तुरूंगातील मुक्काम १४ दिवसांनी वाढला आहे.मुंबई नगर दिवाणी आणि सत्र न्यायालयाने देशमुख यांच्या ईडी कोठडीची मागणी फेटाळली लावत.त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना बेनामी संपत्ती प्रकरणी ईडीची ६ नोव्हेंबर पर्यंत कोठडी सुनावली होती.आज मुंबई नगर दिवाणी आणि सत्र न्यायालयात त्यांना हजर केले असता ईडीने त्यांना अजून ९ दिवसांची ईडी कोठडी देण्याची मागणी केली होती.मात्र न्यायालयाने ईडीची मागणी फेटाळून लावत देशमुख यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.न्यायालयाने ईडीच्या आणि देशमुख यांच्या वकिलांचा युक्तीवाद ऐकला. त्यानंतर हा निर्णय दिला आहे.त्यामुळे देशमुख यांना अजून १४ दिवस कोठडीतच काढावे लागणार आहे.देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी १०० कोटी वसूलीचे गंभीर आरोप केले होते.