नवाब मलिकांचा नवा धमाका ;ड्रग्ज पार्टी प्रकरणी केली मोठी पोलखोल

मुंबई नगरी टीम

मुंबई । राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेवून क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी अनेक पुरावे सादर करीत अनेकांची पोलखोल केली आहे.समीर वानखेडे यांच्या खासगी आर्मीकडून मोठ्या प्रमाणात पैसे वसूली केली जात असून, ड्रग्जच्या नावावर हजारो कोटींची वसुली होत आहे.निरपराध मुलांना यामध्ये फसवले जात आहे.ठरावीक लोकांना लक्ष्य करून वसुली सुरू आहे असा आरोप करतानाच या पार्टीसाठी मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनाही पार्टीला उपस्थित राहण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता पण ते गेले नाही.काही राजकारण्यांच्या मुलांनाही पार्टीला येण्यासाठी जाळे टाकण्यात आले होते असा गौप्यस्फोट मलिक यांनी केला.

मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेवून एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यासह अनेकांची पोलखोल केली.ड्रग्स प्रकरणामुळे चर्चेत आलेले मोहीत कंबोज हे समीर वानखेडेंचे साथीदार असून तेच आर्यन खान प्रकरणातील मास्टरमाईंड असल्याचा खळबळजनक आरोप मलिक यांनी आजच्या पत्रकार परिषदेत केला.पूर्वी काँग्रेसमध्ये आणि आता भाजपामध्ये प्रवेश केलेल्या नेत्याच्या मागे कंबोज फिरत होते.कंबोज यांच्यावर आर्थिक घोटाळ्याचे आरोप असून.त्यांनी ११०० कोटींचा घोटाळा केला असल्याचे सांगून,राज्यात भाजपचे सरकार येताच त्यांनी भाजपात प्रवेश केला.त्यांच्या घरावर सीबीआयची धाडही पडली होती.पण त्यांनी भाजपात प्रवेश केला त्यांनतर त्यांची चौकशी बंद झाली असा आरोप मलिक यांनी केला.जोपर्यंत या प्रकरणातील खलनायक आत जात नाही,तोपर्यंत पिक्चर संपणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.ललित हॉटेल मधिल एक खोली सात महिने बुक होती.याच खोलीतून वानखेडेची प्रायव्हेट आर्मी काम करत होती.विलास भानुशाली,धवल भानुशाली, सॅम डिसूजा या ठिकाणी एकत्र येत असत.त्याठिकाणी काही मुलीही येत होत्या. तसेच ड्रग्जचे सेवनही केले जायचे.ललितमध्ये शबाब आणि कबाब सुरू होते.फक्त नवाब नव्हता.हे सर्व वानखेडे यांचेच लोक होते असेही मलिक म्हणाले.

समीर वानखडे,व्हीव्ही सिंग,आशिष रंजन आणि माने ड्रायव्हर ही एनसीबीच्या कार्यालयातील चांडाळ चौकडी हे सर्व खेळ करत आहे.व्ही. व्ही. सिंग यांनी माझ्या जावयाकडून महागडी गाडी मागितली होती असा खळबळजनक दावाही मलिक यांनी केला.मी कोणत्याही नेत्यावर आरोप करत नाही.शिवाय हे प्रकरण राज्य सरकार आणि केंद्र सरकार मधील लढाई नाही. तर एनसीबीच्या कार्यालयात ही चांडाळ चौकडी बसली आहे त्यांची पोलखोल करीत आहोत. या चांडाळ चौकडीला बाहेर ठेवा,त्यांच्यामुळे या खात्याची बदनामी होत असल्याने यांची चौकशी करा अशी मागणीही मलिक यांनी केली.ड्रग्जची साफसफाई झाली पाहिजे.पण ही चांडाळ चौकडी राहिली तर साफसफाई होणार नाही, असेही मलिक यांनी सांगितले.आर्यन खानप्रकरणात १८ कोटीची मागणी करण्यात आली होती.त्यापैकी ५० लाख घेतले होते मात्र एका सेल्फीने खेळ बिघडवला.मोहित कंबोज हा अपहरणाचा मास्टरमाइंड आहे असा दावाही मलिक यांनी केला.आतापर्यंत झालेल्या धाडीत ज्यांच्या ज्यांच्याकडून पैसे उकळण्यात आले आहेत. त्या सर्वांनी पुढे यावे आणि एनसीबीची पोलखोल करावी.कुणीही घाबरू नये.तुम्ही पीडित आहात. त्यामुळे उघडपणे समोर या, असे आवानही मलिक यांनी या पत्रकार परिषदेत केले.मलिक यांनी यावेळी नमास्क्रे फॅशन टीव्हीच्या स्पॉन्सरचा ब्रँड देखील पडद्यावर दाखवला.या मध्ये दाखवलेल्या पेपर रोलमध्ये ड्रग्ज घेतले जाते अशी माहिती आहे,असे मलिक म्हणाले. आर्यन प्रकरणात हे सँपल हे सील करण्यात आले मग त्याच्या मालकाला का अटक केली नाही ? असा सवाल त्यांनी करून काशिफ खान हा त्याचा मालक असल्याचे सांगितले.त्याचे खरे नाव काशिफ मलिक खान.त्याच्या विरोधात अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. दिल्ली न्यायालयाने त्याला फरार घोषित केले असून,तो समीर वानखेडेंचा साथीदार आहे मात्र त्याला अटक का केली नाही ? असा सवाल मलिक यांनी केला.या प्रकरणात किती जणांना अटक करण्यात आली याची माहिती दिली नव्हती.याचा खुलासा वानखेडे का करत नाही असा सवालही मी यापूर्वी केला होता. त्यानंतर वानखेडे यांनी पत्रकार परिषद घेऊन १४ जणांना अटक केल्याचे सांगितले,मात्र अटक केलेल्या आरोपींची नावे त्यांनी जाहीर केली नाही. घटनास्थळावरून अमीन फर्निचरवाला, प्रतिक गाभा, ऋषभ सचदेव या तिघांना त्यांचे कुटुंबीय घरी घेऊन जातानाचा व्हिडीओ समोर आला आहे. हे तिघे कंबोज यांचे मेव्हुणे असल्यानेच त्यांची सुटका करण्यात आली,व आर्यन खानला खंडणीसाठी या प्रकरणात आडकवण्यात आले.कंबोज यांनी आपल्या मेव्हुण्याच्या मदतीने हा कट रचल्याचा गंभीर आरोपही मलिक यांनी केला.

मोहित कंबोज या सर्व प्रकरणाचा मास्टरमाईंड आहे. कंबोज खंडणी वसूल करण्याचे काम करत असून ते वानखेडे यांचे चांगले मित्र आहेत.याचा एक व्हिडीओ लवकरच प्रसिद्ध करणार असल्याचे मलिक सांगितले.सात तारखेला वानखेडे आणि कंबोज ओशिवरा स्मशानभूमीजवळ भेटल्याचा गौप्यस्फोट देखील यावेळी त्यांनी आहे.मोहित कंबोज हा आर्यन खान अपहरणाचा मास्टर माइंड आहे. त्यात सॅम डिसूझाचाही सहभाग आहे. आज ना उद्या ते तुरूंगात जाणारच आहेत. मी केलेले आरोप खोटे असल्याचे सांगत समीर वानखेडे आता हसत आहेत.मात्र ते नंतर रडणार आहेत असे सांगून सत्यमेव जयते होणारच आहे, असा दावाही मलिक यांनी केला.काशिफ खान यांनी या क्रुझ ड्रग्ज पार्टीला मुंबई शहराचे  पालकमंत्री अस्लम शेख यांना बोलवले होते.शेख यांनी पार्टीला यावे म्हणून त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला.काही राजकारण्यांच्या मुलांनाही पार्टीला येण्यासाठी जाळे टाकण्यात आले होते. मात्र यापैकी कोणीच पार्टीला गेले नाही.शेख यांच्यासह राजकारण्यांची मुल या पार्टीला गेले असते तर उडता पंजाब नंतर उडता महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न होता, असा दावा मलिक यांनी केला.काशिफ खान हा अस्लम शेख यांना पार्टीला का घेवून जाणार होता ? राजकारण्यांच्या मुलांना का जाळ्यात ओढत होता याची एसआयटीनेही चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली.

Previous articleमाजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा तुरूंगातील मुक्काम १४ दिवसांनी वाढला
Next articleक्रांती रेडकर यांच्या बहिणीवर ड्रग्जची केस ? समीर वानखेडे उत्तर द्या-मलिकांचे ट्विट