मुंबई नगरी टीम
मुंबई । दिवसातून ५० जण मला विविध कार्यक्रमांसाठी निमंत्रणे देत असतात.त्याचप्रमाणे काशिफ खान याने मुंबईचा पालकमंत्री म्हणून मला कार्डीलिया क्रूझ पार्टीसाठी निमंत्रण दिले होते.पण मी पार्टीला गेलो नाही.त्या पार्टीविषयी मला काही माहिती नाही,असा खुलासा मुंबई शहरचे पालकमंत्री, मत्सव्यवसाय,वस्त्रोद्योग मंत्री व काँग्रेस नेते अस्लम शेख यांनी आज केला.
मुंबईचे पालकमंत्री आणि राज्याचे मत्सव्यवसाय,वस्त्रोद्योग मंत्री व काँग्रेस नेते अस्लम शेख यांना काशिफ खान याने कार्डीलिया क्रूझ पार्टीसाठी निमंत्रण दिले होते पण ते गेले नाहीत शिवाय राजकारण्यांच्या मुलांना देखील या पार्टीला येण्यासाठी जाळे टाकले होते असा गौप्यस्फोट अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांनी केला होता.त्यानंतर आज राज्याचे मत्सव्यवसाय,वस्त्रोद्योग मंत्री व काँग्रेस नेते अस्लम शेख यांनी याबाबत खुलासा केला.काशिफ खान याने मुंबईचा पालकमंत्री म्हणून मला कार्डीलिया क्रूझ पार्टीसाठी निमंत्रण दिले होते.पण मी पार्टीला गेलो नाही.त्या पार्टीविषयी मला काही माहिती नाही,असे शेख यांनी सांगितले.क्रुझ पार्टीची मोठया प्रमाणावर चर्चा झाली. पण गुजरातमध्ये २१ हजार कोटींचे ड्रग्ज पकडले. त्याची माहिती उघडकीस का येत नाही. त्यावर माध्यमांसह कोणीच काही बोलत कसे नाही, असा सवाल अस्लम शेख यांनी केला.
शेख म्हणाले, पार्टीचा आयोजक काशिफ खान याने आपल्याला पार्टीला बोलावले होते. मात्र काशिफ खान यास आपण ओळखत नाही. तो कुठल्यातरी कार्यक्रमात मला भेटला होता. दिवसातून असे पन्नास लोक मला विविध कार्यक्रमांसाठी आमंत्रण देत असतात. पण या पार्टीला मी गेलो नाही. त्या पार्टीच्या माध्यमातून कोणी षडयंत्र रचले होते का, याचा तपास यंत्रणा घेतील.क्रूझला परवानगी देण्याचे काम आमच्या विभागाचे नाही. आमच्या विभागाने क्रूझला परवानगी दिली नव्हती. सुशांत सिंग आणि दिशा सालियन प्रकरणातही मुंबईच्या पालकमंत्रयाचे नाव घेतले गेले. भाजपा नेत्यांनीही अप्रत्यक्षपणे ते नाव चालविण्याचा प्रयत्न केला. मात्र केवळ बिहार निवडणूक पार पडेपर्यंत हे प्रकरण चालले. बिहारची निवडणूक संपली आणि सुशांतसिंग प्रकरणही संपले. असेही शेख म्हणाले.