राज ठाकरे,आदित्य ठाकरे यांच्यानंतर आता नाना पटोले अयोध्येचा दौरा करणार

मुंबई नगरी टीम

मुंबई । मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि युवा सेना अध्यक्ष आणि पर्यारणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यानंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आयोध्येच्या दौ-यावर जाणार आहेत.अयोध्येतील दशरथ गादीचे प्रमुख महंत बृजमोहन दास यांनी नाना पटोले यांची भेट घेऊन त्यांना अयोध्येला येण्याचे निमंत्रण दिले असून पटोले यांनी या निमंत्रणाचा स्वीकार केला.

राज्यात हनुमान चालीसा आणि भोंग्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.त्यात हिंदुत्वाचा मुद्दा उचलून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या दौ-याची घोषणा केली आहे. त्यांच्या या दौ-याची जय्यत तयारी सुरू असतानाच उत्तर प्रदेशातील एका खासदाराने राज ठाकरे यांच्या अयोध्या दौ-याला तीव्र विरोध केला आहे. अशा परिस्थितीत राज ठाकरे हे येत्या ५ जूनला आयोध्येचा दौरा करणार आहेत. त्या पाठोपाठ युवा सेना अध्यक्ष आणि पर्यारणमंत्री आदित्य ठाकरे हे आयोध्येचा दौरा करणार आहेत. आदित्य ठाकरे हे येत्या १० जूनला आयोध्येच्या दौ-यावर जाणार असल्याची घोषणा खासदार संजय राऊत यांनी केली.ठाकरे काका पुतण्यांच्या या दौ-याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आयोध्येच्या दौ-यावर जाणार आहेत.अयोध्येतील दशरथ गादीचे प्रमुख महंत बृजमोहन दास यांनी आज टिळक भवन, नाना पटोले यांची भेट घेऊन त्यांना अयोध्येला येण्याचे निमंत्रण दिले.या भेटीदरम्यान त्यांनी नाना पटोले यांना प्रभू श्रीरामचंद्राचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येला भेट देण्याचे निमंत्रण दिले.नाना पटोले यांनी त्यांच्या निमंत्रणाचा स्वीकार केला.मात्र पटोले आयोध्येला केव्हा जाणार हे स्पष्ट झाले नाही.

Previous articleवांद्रे येथील शासकीय भूखंडाचा कोट्यवधीचा घोटाळा; एसआयटी मार्फत चौकशी करा
Next article……तर आज राज ठाकरे सुध्दा मुस्लिम झाले असते : रामदास आठवले