मुंबई नगरी टीम
मुंबई । मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणजेच मुंबै बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत बँकेचे विद्यमान अध्यक्ष व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आणि भाजपचे आमदार प्रसाद लाड बिनविरोध निवडून आले.उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी त्यांच्या विरोधात कोणीच अर्ज न भरल्याने दोघांची बँकेचे संचालक म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले.
निवडणुकीसाठी शुक्रवारपर्यंत (तारीख ३) अर्ज भरण्याची मुदत होती. अखेरच्या दिवशी बँकेवर वर्चस्व असलेल्या सहकार पॅनेलच्या २१ उमेदवारांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केले.निवडणूक अधिकारी कैलास जेबले यांनी अर्ज स्वीकारले. या उमेदवारांमध्ये दरेकर आणि लाड यांचाही समावेश होता. त्याचप्रमाणे शिवाजीराव नलावडे, सुनील राऊत, सिद्धार्थ कांबळे, संदीप घनवट, नंदकुमार काटकर, विठ्ठलराव भोसले, अभिजीत अडसूळ, पुरुषोत्तम दळवी, आनंदराव गोळे यांचाही समावेश होता.