मुंबई नगरी टीम
मुंबई । कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सुरू असलेले राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन हे कोरोना नियमाचे पालन करून सुरू असले तरी अनेक लोक प्रतिनिधी हे सभागृहात मास्कचा वापर करताना दिसत नाही. राज्यात कोरोनाच्या रूग्णांमध्ये वाढ होत असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात मास्क न वापरणा-या आमदारांबद्दल संताप व्यक्त केला.उपमुख्यमंत्री पवार यांच्या नाराजीनंतर सभागृहात मास्क न वापरणा-या मंत्री तसेच आमदारांनी पटापट मास्क लावले.
मुंबईत सुरू असलेले राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन हे कोरोना नियमाचे काटेकोर पालन करून घेतले जाईल असे आदेश विधानमंडळ सचिवालयाकडून देण्यात आले आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशनाला हजर राहणा-या अधिकारी आणि कर्मचारी यांना लसीचे दोन डोस आणि कोरोनाची चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. विधानमंडळ सचिवालयाकडून नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्या तरी कामकाज सुरू असताना दोन्ही सभागृहातील काही आमदार विना मास्क वावरताना दिसत आहेत.यावरून आज प्रश्नोत्तराच्या तासात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली.काही जणांचा अपवाद वगळता इतरांकडून मास्कचा वापर करण्यात येत नसल्याचे त्यांनी सांगितले.मास्क न वापरणाऱ्या आमदारांना सभागृहाबाहेर काढावे अशी मागणी देखील त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली.यावेळी उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यानी केवळ कामकाजात प्रत्यक्ष भाग घेताना बोलण्यासाठी मास्क बाजूला करण्याचा अपवाद करून सर्वाना मास्क लावण्याचे निर्देश दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोरोना संदर्भात गंभीर असून त्याबाबत बैठका घेत आहेत. काही राज्यांमध्ये रात्रीच्या वेळी संचारबंदी लागू करण्याच्या चर्चा सुरू आहे.विषाणूमुळे देशात पुन्हा वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे.परदेशात दीड दिवसात रुग्ण संख्या दुप्पट होत आहे. तर येत्या काळात परदेशात पाच लाख लोकांची मृत्यू होण्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेने वर्तवली आहे.त्यामुळे हिवाळी अधिवेशनाचा कालावधी देखील कमी ठेवावा लागला आहे.मात्र काही जणांना या गोष्टींचे गांभीर्य लक्षात घेणे आवश्यक असल्याचे पवार म्हणाले.एखाद्या सदस्याला बोलताना त्रास होत असेल तर आपले बोलून झाल्यानंतर पुन्हा मास्कचा वापर करावा असे आवाहनही त्यांनी केले.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मास्क न वापरण्याच्या मुद्यावरून व्यक्त केलेल्या नाराजीनंतर अनेक मंत्री, आमदार आणि विरोधी बाकांवरील आमदारांनी पटापट खाली घेतलेले मास्क तोंडावर चढवण्यास सुरुवात केली.