मुंबई नगरी टीम
मुंबई । भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणा-या पंचायत समितीच्या निवडणूक निकालांची आज घोषणा करण्यात असून,या निवडणुकीतही भाजपने जिल्हा परिषदेच्या ३८ तर पंचायत समितीच्या ९३ जागा जिंकून बाजी मारली असली तरी महाविकास आघाडीची सरशी झाल्याचे निकालावरून स्पष्ट होत आहे.महाविकास आघाडीला जिल्हा परिषदेच्या एकूण ५६ तर पंचायत समितीच्या एकूण ९४ जागा मिळाल्या आहेत.
भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदेच्या आणि त्या अंतर्गत येणा-या पंचायत समितीच्या निवडणुकीची मतमोजणी आज पार पडली.भंडारा जिल्हा परिषदेच्या ५२ जागांसाठी तर गोंदिया जिल्हा परिषदेच्या ५३ जागांसाठी मतदान घेण्यात आले होते.या दोन जिल्ह्यांच्या अंतर्गत येणा-या पंचायत समितीच्या २१० जागांसाठीही मतदान पार पडले होते.या निवडणुकीची मतमोजणी आज पार पडली असून,भंडारा,गोंदिया जिल्हा परिषदेच्या एकूण १०५ जागापैकी भाजपला ३८ जागांवर विजय मिळाला आहे.काँग्रेसला ३४ जागा तर राष्ट्रवादी काँग्रेसला २१ जागांवर विजय मिळाला आहे. शिवसेनेला एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.जिल्हा परिषदेच्या निकालात ३८ जागा जिंकून भाजप प्रथम अव्वल ठरला असला तरी ५६ जागा महाविकास आघाडीला मिळाल्याने या ठिकाणी महाविकास आघाडीची सरशी झाल्याचे स्पष्ट होते.पंचायत समितीच्या एकूण २१० जागांपैकी भाजपला ९३ जागांवर विजय मिळाला आहे.काँग्रेसला ५३ जागा मिळाल्या आहेत तर राष्ट्रवादीला ३६ जागा मिळाल्या आहेत.शिवसेनेला केवळ ५ जागांवर समाधान मानावे लागले आहे.पंचायत समितीच्या निकालातही भाजपने बाजी मारली असली तरी महाविकास आघाडीला एकूण ९४ जागा मिळाल्याने मविआचे यावर वर्चस्व असल्याचे निकालांवरून स्पष्ट होते.