काँग्रेस राष्ट्रवादीचं बिनसलं ! राष्ट्रवादीनं पाठीत खंजीर खुपसल्याची नाना पटोलेंची टीका

मुंबई नगरी टीम

मुंबई । भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीवरून महाविकास आघाडी सरकार मधिल काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील संबंध ताणले गेले आहे.गोंदियामध्ये राष्ट्रवादीने भाजपला मदत केल्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले कमालीचे नाराज झाले असून,राष्ट्रवादीने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, अशी टीका त्यांनी केली आहे.तर पटोलेंच्या या टीकेला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उत्तर दिले आहे.महाविकास आघाडीत अडथळा आणण्याचा राष्ट्रवादीचा कधीच प्रयत्न राहिला नाही किंवा एकला चलो ही भूमिका राहिलेली नाही असा टोला त्यांनी लगावला.

विदर्भातील भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक काल पार पडली.या निवडणुकीत गोंदियामध्ये राष्ट्रवादीने भाजपला मदत केल्याने काँग्रेसला पराभव पत्करावा लागला.या घडामोडीनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले कमालीचे नाराज झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने आमच्या पाठीत खंजीर खुपसला,अशा शब्दात त्यांनी राष्ट्रवादीवर प्रहार केला आहे.पटोलेंच्या या टीकेला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर देत महाविकास आघाडीत अडथळा आणण्याचा राष्ट्रवादीचा कधीच प्रयत्न राहिला नाही किंवा एकला चलो ही भूमिका राहिलेली नाही.स्थानिक पातळीवर काही ठिकाणी कमी जास्त होऊ शकतं,पण लगेच टोकाची भूमिका घेणं योग्य नाही, असे म्हणत थोडं नरमाईने घेण्याचा सल्ला जयंत पाटलांनी पटोले यांना दिला आहे.तिन्ही पक्ष एकत्र रहावेत हीच आहे.त्यामुळे प्रफुल पटेल हे परदेशी असल्याने त्यांच्याशी संपर्क झाला नाही.कोणत्या परिस्थितीत निर्णय झाला हे पाहिल्यानंतरच बोलणं योग्य ठरेल असे मत पाटील यांनी व्यक्त केले.

नाना पटोले यांचा आरोप चुकीचा आहे. राज्यात येणा-या काळात अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत स्थानिक नेतृत्वाने सर्वांना एकत्र बसवून महाविकास आघाडी एकत्र रहावी असे प्रयत्न करणे अपेक्षित होते. गोंदियामध्ये नाना पटोले म्हणतात त्याप्रमाणे वेगळं काम झालं असेल तर त्याची नोंद पक्ष घेईल असेही पाटील म्हणाले.स्थानिक नेत्यांचे कुणाशी पटतं तर कुणाशी पटत नाही किंवा टोकाची मतमतांतरे कुणाची झाली आहेत याचादेखील दुस-या बाजूने विचार करून घेण्याची आवश्यकता आहे. त्याची माहिती घेऊ. नाना पटोले यांनी संपर्क साधला होता मात्र स्थानिकदृष्टया मनं दुभंगलेली असल्यामुळे अडचणी निर्माण होत असाव्यात कदाचित याबाबतीत तपशीलात जाऊ असेही पाटील यांनी सांगितले.राज्यात ओबीसींचे राजकीय आरक्षण टिकलं पाहिजे असा प्रयत्न महाविकास आघाडी सरकारने केला दुर्दैवाने सर्वोच्च न्यायालयाने वेगळा निर्णय दिला. जर आणखीन पुढे दोन – तीन महिने थांबण्याची तयारी ठेवली असती तर इम्पिरिकल डेटा आला असता आणि सर्व आरक्षण मिळाली असती व सर्वांना न्याय मिळाला असता मात्र न्यायालयाने निर्णय दिला आहे त्यावर काही विधान करायचं नाही परंतु मध्यप्रदेशमध्ये सुध्दा भाजपला ओबीसी आरक्षण टिकवता आले नाही अशी टीका पाटील यांनी केली.ओबीसींच्या आरक्षणविरोधी महाविकास आघाडी सरकारने भूमिका घेतली हे विरोधकांचे आरोप खोडसाळ आहेत.मुळात भाजपची सत्ता असताना ओबीसींना ते आरक्षण देऊ शकले नाहीत असा टोलाही पाटील यांनी लगावला.

Previous article१४ महानगरपालिकांच्या निवडणुकांसदर्भात निवडणूक आयोगाने दिले महत्वाचे आदेश
Next articleमंत्रिमंडळाची बैठक सुरू असतानाच मंत्रालयातील बत्तीगुल