मुंबई नगरी टीम
मुंबई । शिवसेना आणि भाजपचा काडीमोड झाल्यानंतर महानगरपालिका निवडणुकीत भाजपा आणि मनसेची युती करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असतानाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसे भाजपच्या युतीवर मोठे वक्तव्य केले आहे.
भाजप आणि शिवसेनेमध्ये दुरावा निर्माण झाल्यावर माजी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी चर्चा केल्याने आगामी महानगरपालिका निवडणुकीत मनसे भाजप युती होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीचा कोणताही प्रस्ताव नाही व तसा काहीही निर्णय झालेला नाही असा मोठा खुलासा पाटील यांनी आज केला.