मुंबई नगरी टीम
मुंबई । भाजपा सरकारला हटवून बंगालच्या उपसागरात फेकून देण्याची गरज आहे,असे वक्तव्य तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केले होते. अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना निराशा व्यक्त करत त्यांनी ही टीका केली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरदृष्टी नसलेले देखील म्हटले. देशात नेतृत्व बदलाची गरज असल्याचे सांगत या विषयावर लवकरच ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचा दावाही त्यांनी केला होता. दरम्यान, राव यांच्या टीकेला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
“तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी भाजपाला बंगालच्या उपसागरात फेकून देण्याचे वक्तव्य केले होते. त्यांनी असे वक्तव्य करणे योग्य नाही. जर ते भाजपाला बंगालच्या उपसागरात फेकून देऊ असे म्हणत असतील तर, आम्ही देखील त्यांना कन्याकुमारीमधील तिन्ही समुद्रात फेकून देऊ,” असे रामदास आठवले म्हणाले आहेत.भाजपावर टीका करतना तेलंगणाचे मुख्यमंत्री म्हणाले होते की, “देशात नेतृत्व बदलाची गरज आहे. त्यावर चर्चा करण्यासाठी मी मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. या देशाला नेमकी कशाची गरज आहे, यावर आम्ही विचार करू आणि कामाला सुरुवात करू. आपला देश मजबूत आहे, यावर माझा ठाम विश्वास आहे. जिथे गरज असते, तिथे आपला देश प्रतिक्रिया देतो. भारतात बदलाची गरज आहे, क्रांतीची गरज आहे. जोपर्यंत आपण लढत नाही तोपर्यंत आपल्या देशात बदल होणार नाही,” असे ते म्हणाले.