मुंबई नगरी टीम
मुंबई । विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या ताफ्यातील वाहनांना आज सकाळी पवई येथे जोगेश्वरी-लिंकरोड वर अपघात झाला.सुदैवाने विरोधी पक्ष नेते दरेकर हे सुखरुप असून त्यांच्या ताफ्यातील अन्य कुणालाही दुखापत झालेली नाही.परंतु या ताफ्यातील वाहनांचे नुकसान झाले आहे. गेल्या काहि महिन्यांतील त्यांच्या वाहनांच्या ताफ्यातील अशा प्रकारच्या अपघाताची ही चौथी घटना आहे. अशा वारंवार होणा-या अपघातामुळे विरोधी पक्ष नेते दरेकर यांच्या घातपाताची शक्यता व्यक्त होत असून या गंभीर घटनेची तातडीने चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे.तसेच विरोधी पक्ष नेते दरेकर यांना तातडीने पुरेशी सुरक्षा व्यवस्था देण्याची मागणीही भाजपाच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
विरोधी पक्षनेते दरेकर आज सकाळी जोगेश्वरी येथील कार्यक्रम आटपून पुढील कार्यक्रमासाठी घाटकोपर येथे रवाना होत असताना जोगेश्वरी- विक्रोळी लिंक रोडवर पवईच्या परिसरात दरेकर यांच्या ताफ्यातील वाहनासमोर बाईकस्वार आडवा आल्यामुळे हा अपघात घडला. यामुळे दरेकर यांच्या वाहनासह ताफ्यातील तीनही गाडयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने दरेकर व अन्य कोणालाही दुखापत झालेली नाही. परंतु दरेकर यांच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात होण्याच्या घटना वारंवार घडत आहे. आजचा अपघात हा गेल्या काही महिन्यातील चौथा अपघात आहे. दोनच दिवसांपूर्वी १७ फेब्रुवारी २०२२ रोजी दरेकर सातारा,महाबळेश्वरला शासकीय वाहनांनी जाताना पुणे-बंगळुरू महामार्गावर पारगाव खंडाळा येथे त्यांच्या ताफ्यातील वाहनांना अपघात झाला. तसेच त्यापूर्वी जुलै २०२० जळगांव येथे, त्यानंतर २९ जानेवारी २०२२ रोजी मालेगाव येथे अपघात झाला आहे व आजच्या अपघाताची चौथी घटना आहे. गेल्या काही दिवसातील दरेकर यांच्या ताफ्यातील वाहनांच्या अपघाताच्या घटना या अतिशय गंभीर असून या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन विरोधी पक्षनेते दरेकर यांच्या ताफ्यातील गाड्यांना झालेला अपघात हा घातपात तर नाही ना अशी शंका व्यक्त होण्यास वाव निर्माण झाला आहे.
अपघातानंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर काय म्हणाले ?
विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर महाविकास आघाडी सरकाच्या विरोधात गेल्या अडीच वर्षापासून आवाज उठवित आहेत. भ्रष्टाचार, गुंडगिरी, शासनाच्या विविध खात्यातील घोटाळे याविरोधात दरेकर वारंवार आवाज उठवित आहेत. त्यामुळे सरकार गडबडून गेले आहे. तसेच विरोधी पक्ष नेता या नात्याने ते जिल्हा, तालुका व गाव पातळावर विविध ठिकाणी भेट घेऊन तेथील प्रलंबित प्रश्न व गैरव्यहार यांना वाचा फोडण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे या गंभीर घटना पाहता काहीतरी घातपाताचा संशय येत आहे. म्हणूनच या सर्व घटनांची विशेष पथकामार्फत तातडीने चौकशी करावी तसेच विरोधी पक्ष नेत्यांच्या सुरक्षितेबाबत राज्य सरकारने योग्य ती काळजी घ्यावी. त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली पाहिजे. जर यासर्व प्रकरणांची सरकारने गांर्भीयाने दखल घेतली नाही तर भाजपा रस्त्यावर उतरुन सरकारच्या विरोधात आंदोलन करेल असा इशारा आमदार गोपीचंद पडाळकर यांनी दिला आहे.
आमदार प्रसाद लाड म्हणाले……तर आघाडी सरकार जबाबदार
विरोधी पक्ष नेते दरेकर यांच्या ताफ्यातील वाहनांचे वारंवार होणारे अपघात म्हणजे काहीतरी घातपाताचा प्रकार असल्याचा आम्हाला संशय आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी चौकशी करण्याची मागणी आमदार प्रसाद लाड यांनी केली आहे. भविष्यात दरेकर यांच्या जीविताला काही बरे वाईट झाल्यास त्याला सर्वस्वी महाविकास आघाडीचे सरकार जबाबदार असेल असेही आमदार लाड यांनी स्पष्ट केले आहे.
विरोधी पक्षनेते दरेकर यांची सुरक्षा व्यवस्था वाढविण्याची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे याबाबत योग्य तो निर्णय घेऊन सहकार्य करण्याची विनंती आमदार रमेशदादा पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना कालच एका निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.