मुख्यमंत्री राज्य सरकारच्या कारभारात लक्ष घालत नसल्याने प्रश्न चिघळले

मुंबई नगरी टीम

मुंबई । अंमलबजावणी संचालनालयाने केलेल्या कारवाईत फ्लॅट,जमीन जप्त झाल्याने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा तोल गेला आहे.यामुळेच ते किरीट सोमय्या यांच्यावर खोटेनाटे आरोप करीत आहेत,मुख्यमंत्री राज्य सरकारच्या कारभारात लक्ष घालत नसल्याने एसटी संप, वीज टंचाई असे प्रश्न चिघळले आहेत,असा घणाघात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला.

राज्य सरकारला एसटी कर्मचाऱ्यांचा संप व्यवस्थित हाताळता न आल्यानेच कामगारांच्या संयमाचा बांध सुटला, असेही राणे यांनी नमूद केले. भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.खा.राऊत यांच्यावर अंमलबजावणी संचालनालयाने केलेली कारवाई कायद्यानुसारच आहे.राऊत यांनी आपल्या मालमत्तेबाबत अंमलबजावणी संचालनालयाकडे खुलासा करावा. त्यांच्या ज्ञात उत्पन्नातून एवढी मालमत्ता कशी खरेदी केली याचा खुलासा करण्याऐवजी खा.राऊत हे किरीट सोमय्या यांच्यावर बेछूट आरोप करत आहेत.किरीट सोमय्या यांच्यामागे भारतीय जनता पार्टी खंबीरपणे उभा आहे. खा.राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर आरोप करणे थांबवावे असेही राणे यांनी सांगितले.यावेळी राणे यांनी राज्य सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली.ते म्हणाले की,सध्या राज्य मुख्यमंत्र्यांविनाच चालू आहे, अशी स्थिती आहे. मुख्यमंत्री राज्य सरकारच्या कारभारात लक्ष घालत नसल्याने एसटी संप, वीज टंचाई असे प्रश्न चिघळले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांना राज्यकर्त्यांकडून धमक्या दिल्या गेल्या. सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा सहानुभूतीने विचार न केल्यानेच कामगार संतप्त होऊन रस्त्यावर उतरले.

Previous articleराज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीतून माझे नाव वगळा,राजू शेट्टीची राज्यपालांकडे मागणी
Next article‘सिल्व्हर ओकवर’ झालेल्या हल्ल्यानंतर शरद पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया !