केंद्र सरकारमुळेच महाराष्ट्रावर लोडशेडींगचे संकट ;ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा आरोप

मुंबई नगरी टीम

नागपूर । कोळशाची टंचाई आणि उष्णतेमुळे राज्यात विजेची मागणी वाढली असून वीज निर्मिती प्रकल्पांमध्ये केवळ दीड ते दोन दिवस पुरेल इतकाच कोळशाचा साठा आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सध्या निर्माण झालेले लोडशेडींगचे संकट दूर करण्यासाठी केंद्रसरकारने तातडीने कोळसा पुरवठा करावा, अशी मागणी राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना केली.केंद्र सरकारमुळेच राज्यावर लोडशेडिंगचे संकट ओढवले असल्याची टीका ही त्यांनी यावेळी केली.

“लोडशेडिंग टाळण्यासाठी गुजरातमधून ७६० मेगावॅट वीज विकत घेतली असून उरलेल्या कोळशातून ५०० मेगावॅट वीज निर्मिती करण्याचे निर्देश महानिर्मिती कंपनीला दिले आहेत. महाराष्ट्राला लोडशेडिंगमूक्त करण्याच्या उद्देशाने मी स्वतःसाठी १९ एप्रिलची डेडलाईन ठरविली आहे. त्यादिवशी मी केलेले प्रामाणिक प्रयत्न जनतेला दिसतील,” असेही ऊर्जामंत्री म्हणाले.लोडशेडिंगच्या मुद्यावरून भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना डॉ. राऊत म्हणाले, केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशात कोळशाची टंचाई निर्माण झाली आहे. केंद्राच्या कोळसा खाणीतून राज्याला आवश्यक असलेल्या कोळशाचा पुरवठा होत नसल्याची वस्तुस्थिती आहे. जर कोळसा टंचाई नाही तर केंद्राने कोळसा आयात करण्याची सूचना राज्याला का केली?, असा सवाल त्यांनी विचारला. कोरोनातून बाहेर पडल्याने राज्यात सर्व व्यवहार, उद्योगधंदे सुरु झाले आहेत. त्यात उष्णता वाढल्यामुळे विजेची मागणी वाढली आहे. ही मागणी २७ हजार मेगावॅटपर्यंत पोहोचली आहे.मात्र, वीज निर्मिती प्रकल्पांमध्ये केवळ दीड ते दोन दिवस पुरेल इतकाच कोळसा साठा शिल्लक आहे. त्यामुळे केंद्रसरकारने राज्याला तात्काळ कोळसा पुरवठा करण्याची आवश्यकता आहे. याशिवाय जेथे कोळसा उपलब्ध आहे तेथून कोळसा आणण्यासाठी रेल्वे डबे उपलब्ध नाहीत. रावसाहेब दानवे यांना महाराष्ट्रातील जनतेविषयी कळवळा असेल तर त्यांनी टीका करण्यापेक्षा कोळसा उपलब्ध करून द्यावा, असे आव्हान ऊर्जामंत्र्यांनी दिले.
राज्याच्या ग्राम विकास खात्याकडे ऊर्जा विभागाची ८ हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे. ही रक्कम आम्हाला मिळाल्यास यातील २२०० कोटी केंद्र सकारकडून कोळसा खरेदी करण्यासाठी वापरता येईल. कोळसा टंचाईच्या प्रश्नावर केंद्रीय ऊर्जामंत्र्यांशी माझी चर्चा सुरु असल्याचे ही त्यांनी सांगितले. बाहेरून वीज विकत घेऊन आणि उरलेल्या कोळशातून वीजनिर्मिती करून राज्याला लोडशेडिंगमुक्त करण्याचा निर्धार डॉ. राऊत यांनी व्यक्त केला. ऊर्जा विभागाची आर्थिक स्थिती चांगली नसल्यामुळे वीजपुरवठा अखंडित राहण्यासाठी जनतेने थकीत वीज बिले भरावीत, असे आवाहनही ऊर्जामंत्र्यांनी यावेळी केले.

Previous articleहोय..मी मोहम्मद अली रोडवर १३ वा स्फोट झाल्याचे म्हणालो ! शरद पवारांनी सांगितले कारण
Next articleमशिदीसमोर भोंगे लावल्याने देशातील बिघडलेले वातावरण चांगले होईल