मुंबई नगरी टीम
मुंबई । राज्यसभेच्या ६ जागांसाठी येत्या १० जून रोजी निवडणूक होत असून,शिवसेनेच्या दोन उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.तर राष्ट्रवादीने प्रफुल पटेल यांच्या नावाची घोषणा केली आहे,काँग्रेस आणि भाजपने आपल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केली नसली तरी काँग्रेस एक तर भाजपा दोन जागा लढविण्याची शक्यता आहे.त्यातच संभाजीराजे छत्रपती यांनी निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा केली असल्याने राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.
राज्यसभेच्या ६ जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची ३१ मे शेवटी मुदत आहे.या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून संजय राऊत आणि संजय पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.राष्ट्रवादीने ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांना उमेदवारी दिली आहे.सध्याचे संख्याबळ पाहता काँग्रेस एक तर भाजप दोन जागा लढवू शकतात.दुस-या जागेसाठी संभाजीराजे यांना शिवसेनेकडून काही अटी घालण्यात आल्याने त्यांनी या निवडणुकीतून माघार घेण्याची घोषणा आज केली आहे.त्यामुळे राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
उमेदवारी संदर्भात काय म्हणाले संभाजीराजे
राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी हवी असल्या पक्षात प्रवेश करा,असे सांगत आधी दिलेला शब्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोडला, अशी टीका माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला. तसेच घोडेबाजार टाळण्यासाठी राज्यसभा निवडणुकीतून माघार घेत आहे. ही माघार नसून हा माझा स्वाभिमान आहे, असेही संभाजीराजे म्हणाले.
मला जे बोलायचे आहे तजे मी बोलणार आहे,ती माझी मुळीच इच्छा नाही.माझ्या तत्वातही नाही. तरीसुद्धा मला बोलायचं आहे. राज्यसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यनंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी शिवसेनेचे दोन खासदार माझ्याकडे पाठवले. त्यावेळी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यास तत्काळ उमेदवारी जाहीर करू, असे सांगितले. परंतु मी राज्यसभेत राष्ट्रपती नियुक्त खासदार होतो. मला कुठल्या पक्षात प्रवेश करायचा नाही. मी अपक्ष लढणार आहे हे त्यांना सांगितले होते. त्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी भेटण्यासाठी बोलविले होते.त्यावेळी त्यांच्यासमोर राज्यसभेसाठी शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार बनवण्याचा प्रस्ताव ठेवला होता. तो प्रस्ताव त्यांनी मान्य केला होता. मी कागदपत्रे आणि अन्य बाबींची पुर्तता करण्यासाठी कोल्हापूरला गेलो. त्यावेळी मी शिवसेनेत प्रवेश करत असल्याच्या बातम्या पेरण्यात आल्या. त्यानंतर लगेचच कोल्हापुरातील संजय पवार यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. ज्या वेगाने ही प्रक्रिया घडली तो एकप्रकारे विश्वासघात होता. मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिलेला शब्द मोडला आहे. मी जर उमेदवारी अर्ज भरला तर माझा विजय निश्चित आहे.मात्र, माझ्या उमेदवारीमुळे घोडेबाजार होईल.या घोडेबाजारातून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण कलुषित होईल. त्यामुळे मी स्वाभिमानाने माघार घेत आहे.माझी खरी ताकद जनता आहे. स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढणार आहे. मला शिवसेनेबाबत किंवा अन्य कुठल्याही पक्षाबाबत कोणताही द्वेष, राग नाही.
उमेदवारी संदर्भात शिवसेना नेत्यांशी अंतिम बोलणी करुन मी कोल्हापूरला पोहोचलो तेव्हा,संजय पवार या माझ्या लाडक्या कार्यकर्त्याला शिवसेनेची उमेदवारी मिळाल्याचे समजले, यानंतर मी शिवसेनेच्या खासदार आणि मंत्र्याला या सगळ्याविषयी विचारले.मात्र,काहीही बोलू शकले नाहीत. मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही फोन केला.मात्र, त्यांनी माझा फोन उचललाच नाही, अशी खंत संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केली.
काय आहे आकड्यांचे गणित !
सध्या महाविकास आघाडीकडे १६९ आमदार आहेत. शिवसेना ५५, राष्ट्रवादी ५४, काँग्रेस ४४, इतर पक्ष ८ आणि अपक्ष ८ असे महाविकास आघाडीकडे संख्याबळ आहे. तर भाजपकडे ११३ आमदारांचे संख्याबळ आहे. भाजपचे १०६ आमदार, रासप १, जनसुराज्य १ आणि अपक्ष ५ आमदार अशा एकूण ११३ आमदार भाजपकडे आहेत.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेला कार्यक्रम
अधिसूचना जाहीर करणे – २४ मे २०२२
अर्ज करण्याची अंतिम तारीख – ३१ मे २०२२
अर्जांची छाननी – १ जून २०२२
अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख – ३ जून २०२२
मतदानाचा दिवस – १० जून २०२२
मतदानाची वेळ – सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत
मतदान मोजणी – १० जून २०२२ (सायंकाळी ५ वाजता)