सुप्रिया सुळेंवर केलेली टीका चंद्रकांत पाटलांना भोवणार; महिला आयोगाकडून खुलासा करण्याचे निर्देश

मुंबई नगरी टीम

मुंबई । तुम्ही घरी जा,स्वयंपाक करा.दिल्लीत जा,नाही तर मसणात जा, असे वक्तव्य करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील अडचणीत सापडले आहेत.पाटील यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर केलेल्या टीकेची दखल राज्य महिला आयेगाने घेतली असून,या वक्तव्याबाबत लेखी खुलासा राज्य महिला आयोगास सादर करण्याबाबतचे निर्देश चंद्रकांत पाटील यांना देण्यात आलेले आहे.

ओबीसी आरक्षण आंदोलनासमयी पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबाबत महाराष्ट्र राज्य महिला आयोगास तक्रार अर्ज प्राप्त झाले आहेत.महिला आज स्वकर्तुत्वावर शिक्षण,व्यवसाय,समाजकारण व राजकारणासह सर्व क्षेत्रात अग्रेसर आहेत.चंद्रकांत पाटील यांनी केलेले वक्तव्य समस्थ महिला वर्गाच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचविणारे आहे. एका लोकप्रतिनिधीकडून असे वक्तव्य होणे ही खेदाची बाब आहे.यापुढे महिलांचा सन्मान राखला जाईल याचे भान चंद्रकांत पाटील यांनी राखावे. तसेच केलेल्या वक्तव्याबाबत लेखी खुलासा राज्य महिला आयोगास सादर करण्याबाबतचे निर्देश चंद्रकांत पाटील यांना देण्यात आलेले आहेत असे आयोगाकडून सांगण्यात आले.

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या होत्या ?

दिल्लीत कोणाच्या बैठका झाल्यानंतर मध्य प्रदेशात ओबीसी आरक्षण देण्याबाबतचा निकाल लागला, तसेच दिल्लीत गेल्यावर केंद्र सरकारला याबाबत प्रश्न विचारणार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले होते.ओबीसी आरक्षणासंदर्भात आपण एकत्र लढायचे असे ठरले होते.मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री दिल्लीला गेले. दोन दिवसांत असं काय त्या सरकारने केले आणि दिल्लीत बैठक झाली आणि त्यांना न्याय मिळाला आणि आपल्यावर अन्याय झाला. याचे उत्तर मी केंद्र सरकारला विचारणार आहे. मध्य प्रदेश बाबत जो निर्णय दिला आहे तो अंतिम निर्णय नाही. त्यामुळे हे जे सांगत आहे की मध्य प्रदेशला जमले आणि तुम्हाला जमले नाही यातही खोटेपणा आहे, असे त्या म्हणाल्या होत्या.

चंद्रकांत पाटील यांनी काय टीका केली होती ?

तुम्ही राजकारणामध्ये कशासाठी राहता,घरी जा आणि स्वयंपाक करा.तुम्ही खासदार आहात ना. एका मुख्यमंत्र्यांची भेट कशी घ्यायची हे तुम्हाला कळत नाही. तुम्ही दिल्लीत जा नाहीतर मसणात जा.शोध घ्या आणि आरक्षण द्या, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. तसेच तुम्हाला मसण माहिती आहे ना, असे पाटील म्हणाले होते.

Previous articleबदल्यांच्या प्रतीक्षेत असणा-यांसाठी वाईट बातमी; सरकारने ३० जून पर्यंत बदल्या थांबवल्या
Next articleसंभाजीराजे छत्रपतींच्या माघारीमुळे राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार !