बदल्यांच्या प्रतीक्षेत असणा-यांसाठी वाईट बातमी; सरकारने ३० जून पर्यंत बदल्या थांबवल्या

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्य सरकारी कर्मचा-यांच्या नियमित बदल्या या ३१ मे पर्यंत करण्यात येतात.गेली दोन वर्षे कोरोनाच्या संकटामुळे बदल्या पुढे ढकलण्यात आल्या होत्या.यंदा कोरोनाचे संकट टळल्यामुळे या आर्थिक वर्षातील बदल्यांची लगबग सुरू असतानाच राज्य सरकारने या वर्षातील नियमित बदल्या येत्या ३० जून पर्यंत करू नये असे आदेश जारी केल्याने बदल्यांच्या प्रतिक्षेत असणा-यांचा हिरमोड झाला आहे.

मे महिन्याचा शेवटचा आठवडा असल्याने राज्याचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयात बदल्यांसाठी मोठी लगबग सुरू असतानाच बदलीच्या प्रतिक्षेत असलेल्यांना राज्य सरकारने मोठा झटका दिला आहे. नियमित बदल्या या ३० जून पर्यंत करण्यात येवू नयेत असा आदेश आज राज्य सरकारने काढला आहे.राज्य सरकारच्या या नव्या आदेशामुळे बदल्यांच्या प्रतिक्षेत असणा-यांचा हिरमोड झाला आहे.प्रत्येक आर्थिक वर्षातील नियमित बदल्या या मे च्या शेवटच्या आठवड्यात करण्यात येतात.त्यासंदर्भातील हालचाली प्रशासकीय पातळीवर सुरू होत्या.गेल्या आठवड्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आणि शालेय शिक्षण विभागातील काही अधिका-यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत.तर या आठवड्यात बदल्यांच्या प्रतीक्षेत असतानाच आज शासनाने आदेश काढून या आर्थिक वर्षातील बदल्या या ३० जून पर्यंत काढण्यात येऊ नये असे आदेश काढले आहेत.प्रशासकीय कारणास्तव तातडीने एखादी बदली करणे आवश्यक असल्यास अशी बदली मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने करावी असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Previous articleशिवसेनेकडून संजय राऊत आणि संजय पवार यांचे अर्ज दाखल; संभाजीराजे कोणता निर्णय घेणार ? 
Next articleसुप्रिया सुळेंवर केलेली टीका चंद्रकांत पाटलांना भोवणार; महिला आयोगाकडून खुलासा करण्याचे निर्देश