शिवसेनेकडून संजय राऊत आणि संजय पवार यांचे अर्ज दाखल; संभाजीराजे कोणता निर्णय घेणार ? 

मुंबई नगरी टीम

मुंबई । संभाजीराजे यांनी शिवसेनेची ऑफर नाकारल्यानंतर अखेर आज शिवसेनेकडून संजय राऊत आणि शिवसेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले.अर्ज दाखल करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित होते.शिवसेनेने आपले उमेदवारी अर्ज भरल्याने संभाजीराजे यांची कोंडी झाली असून,उद्या पत्रकार परिषद घेऊन ते आपली भूमिका जाहीर करणार आहेत.

राज्यसभेच्या दोन्ही जागा शिवसेना लढवणार असल्याचे आज स्पष्ट झाले. एका जागेसाठी संजय राऊत यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला होता. तर दुस-या जागेसाठी शिवसेनेकडून संभाजीराजे यांना शिवबंधन बांधण्याची अट घालण्यात आली होती. मात्र त्यांनी शिवसेनेची ऑफर धुडकावून लावल्याने शिवसेनेने अखेर शिवसेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख संजय पवार यांना उमेदवारी जाहीर केली.राज्यसभेसाठी आज शिवसेनेकडून संजय राऊत आणि संजय पवार यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.दरम्यान संभाजीराजे छत्रपती यांना पाठिंबा न देता शिवसेनेने आपले उमेदवारी अर्ज भरल्याने त्यांची कोंडी झाली आहे. त्यातच अपक्ष लढण्यासाठी त्यांना १० आमदारांच्या स्वाक्षऱ्या आवश्यक आहेत. मात्र महेश बालदी आणि मनसेचे आमदार राजू पाटील या दोघांच्या सह्या त्यांना मिळाल्या आहेत. त्यातच भाजपकडूनही त्यांना पाठिंबा मिळण्याची शक्यता दिसत नसल्याने त्यांची राज्यसभेची वाट आता जवळपास बंद झाली आहे. त्यामुळे संभाजीराजे या निवडणुकीतून माघार घेण्याची शक्यता आहे. ते उद्या शुक्रवारी सकाळी अकरा वाजता मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर करणार आहेत.

Previous articleराज्यसभेसाठी भाजप तिसरा उमेदवार देणार का ? चंद्रकांत पाटील यांनी दिली महत्वाची माहिती
Next articleबदल्यांच्या प्रतीक्षेत असणा-यांसाठी वाईट बातमी; सरकारने ३० जून पर्यंत बदल्या थांबवल्या