संजय राऊतांचे मोठे वक्तव्य : शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार

मुंबई नगरी टीम

मुंबई । शिवसेना नेते आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले असताना बंडखोर आमदारांची इच्छा महाविकास आघाडीतून बाहेर पडावे,अशी असेल तर त्यांनी मुंबईत परत यावे आणि आपली मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सांगावी,महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याबद्दल विचार करु असे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे.त्यांच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या सुमारे ३० आमदारांनी बंडखोरी केल्याने महाविकास आघाडीमध्ये एकच खळबळ उडाली आहे.शिवसेना आमदारांच्या बंडखोरीमुळे राज्यातील सरकार अडचणीत सापडले आहे.काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बंडखोर आमदारांना भावनिक आवाहन करीत वर्षा निवासस्थान सोडून मातोश्रीवर मुक्काम हलवला.त्यानंतर बंडखोरांची भूमिका मवाळ होईल अशी अपेक्षा शिवसेनेचे नेते व्यक्त करीत होते.मात्र मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतरही बंडखोर आमदार आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सुरतहून परतलेले कैलास पाटील आणि गुवाहाटीमधून परतलेले नितीन देशमुख यांच्या उपस्थितीत माध्यमांशी संवाद साधला.भाजपने शिवसेनेच्या आमदारांचे अपहरण केल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी करून,राजकारणाने किती खालची पातळी गाठली आहे हे स्पष्ट होते असा आरोप केला. शिंदे यांच्या ताब्यात असलेल्या २१ आमदारांशी संपर्क झाला असून, ते आमदार लवकरच मुंबईत परत येतील असा विश्वसाही त्यांनी व्यक्त केला.एकनाथ शिंदे यांच्या गटात गेलेल्या आमदारांवर दबाव असून त्यांना उद्धव ठाकरेंच्या गटात यायचे आहे. त्यांनी आमच्याशी संपर्क साधला आहे. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारला कसलाही धोका नाही असा दावाही राऊत यांनी केला.

शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडावे आणि भाजपसोबत जावे अशी अट शिवसेनेकडे ठेवली आहे.यावर बोलताना राऊत म्हणाले की,या आमदारांनी २४ तासांत मुंबईत यावे आणि त्यांची मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सांगावी.त्यांनी समाज माध्यमातून न बोलता ठाकरे यांच्या समोर येवून बोलावे.त्यानंतर महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याबद्दल विचार करु.संजय राऊत यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षांना विश्वासात घ्यायला पाहिजे होते असे भुजबळ यांनी सांगितले.

Previous articleबंडखोर आमदाराची खदखद : गेली अडीच वर्षे शिवसेना आमदारांसाठी वर्षाची दारं बंद होती
Next articleठाकरे सरकार संकटावर मात करून विधानसभेत बहुमत सिद्ध करेल : शरद पवारांचा विश्वास