मुंबई नगरी टीम
मुंबई । मी शिवसेनेतच असून बाळासाहेबांच्या आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आमच्या घटक पक्षांमुळे वाईट नजर लागली आहे.त्यांच्या वाईट नजरेतून शिवसेनेला बाहेर काढण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे यांनी केला आहे.त्यांचे समर्थन करण्यासाठी मी गुवाहाटीला आलो आहे,असे रत्नागिरीचे आमदार आणि मंत्री उदय सांमत यांनी स्पष्ट केले आहे.
शिवसेनेचे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री.उदय सामंत यांनी आजही आपण शिवसेनेसोबतच असल्याचे स्पष्ट करत आपण स्वखुशीने हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मनातील हिंदुत्वाचा विचार पुढे नेणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटी येथे आलेलो आहोत.#MiShivsainik pic.twitter.com/YnSaohrtDj
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 28, 2022
रत्नागिरीचे शिवसेनेचे आमदार आणि मंत्री उदय सामंत यांनी गुवाहटीला जावून एकनाथ शिंदे यांच्या गटात सामिल होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथमच त्यांनी आज समाज माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.एकनाथ शिंदे यांनी आज मंत्री उदय सामंत यांचा एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे.मी शिवसेनेतच आहे.पण बाळासाहेबांच्या आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आमच्या घटक पक्षांमुळे वाईट नजर लागली आहे.त्यांच्या वाईट नजरेतून शिवसेनेला बाहेर काढण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे यांनी केला आहे.त्यांचे समर्थन करण्यासाठी मी गुवाहाटी मध्ये आलो आहे.कोणाच्याही गैरसमजांना बळी पडू नका.मी शिवसेनेत आहे.बाळासाहेबांची आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना टिकली पाहिजे असे आवाहन सामंत यांनी पदाधिकाऱ्यांना केले.राज्यसभा निवडणुकीत संभाजीराजे छत्रपती यांना शिवसेना पुरस्कृत म्हणून उमेदवारी देणार होतो. पण आपण सर्वसामान्य शिवसैनिकाला तिकीट दिले.त्यानंतर या शिवसैनिकाला राज्यसभेत जाता येणार नाही यासाठी घटक पक्षांनी योग्य बंदोबस्त केला असे सांगून, अशाच पद्धतीने शिवसेना संपण्याचा प्रयत्न घटक पक्ष करत आहेत असा आरोप त्यांनी यावेळी केला.घटक पक्षाच्या वाईट नजरेच्या विळख्यातून शिवसेनेला बाहेर काढण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी आखलेल्या मोहिमेत मी सहभागी झालो आहे.त्यामुळे कोणीही गैरसमज करुन घेऊ नये.मी शिवसेनेत आहे त्याचाच विचार पुढे नेण्याचा प्रयत्न करणार आहे, असेही सामंत यांनी व्हिडीओच्या माध्यमातून भूमिका स्पष्ट केली .