मुंबई नगरी टीम
मुंबई । बंडखोरी केलेल्या ५० आमदारांमधिल एक दोन सोडता बाकीचे सर्व आमदार येत्या निवडणुकीत पराभूत होतील असा दावा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला होता.त्यांचा हा दावा खोडत माझ्या ५० आमदारांपैकी एकही आमदार पडला तर राजकारण सोडेन असे आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विरोधकांना दिले.
शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी आज जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यावेळी रविंद्रनाट्य मंदिर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नागरी सत्कार करण्यात आला.त्यावेळी आपल्या आक्रमक भाषणात मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.त्यांनी यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्याचाही खरपूस समाचार घेतला.शिवसेनेच्या बंडखोर आमदारांपैकी एक दोन वगळता बाकीचे सर्व आगामी निवडणुकीत पराभूत होतील असा दावा त्यांनी केला होता.माझ्या ५० पैकी एकही आमदार पडू देणार नाही, एकही आमदार पडला तर राजकारण सोडेन असे आव्हान त्यांनी विरोधकांना दिले.त्यावेळी त्यांनी तुपान फटकेबाजी करत ठाकरे आणि महाविकास आघाडीवर चौफेर फटकेबाजी केली. आम्ही बंडखोरी केली नसून हिंदुत्त्वाचा विचार पुढे नेण्यासाठी ही भूमिका घेतली असल्याचे सांगितले.आमदारांच्या प्रश्नाबाबत मी पक्ष प्रमुखांना अनेकदा भेटलो,या आमदारांच्या व्यथा ऐका अशी त्यांना विनंती केली मात्र त्यांनी ऐकले नाही.त्यामुळेच आम्ही सर्वांनी हा निर्णय घेतला असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.
शिवसेनेचा मुख्यमंत्री असतानाही पक्ष चार नंबरला गेला,काही कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले.राज्यात सरकार असतानाही अशा गोष्टींना सामोरे जावे लागले आहे, असे सांगून आता शिवसेनेच्या आमदारांच्या मतदार संघात एकही काम शिल्लक राहणार नाही असा विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.मी छोट्या मोठ्या मोहिमा करायचो.मात्र ही मोहिम मोठी होती त्यामुळेच मला झोप येत नव्हती.मला माझी काळजी नव्हती तर माझ्या सोबत आलेल्या ५० आमदारांच्या भविष्याची काळजी होती असेही यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.मी एकटा मुख्यमंत्री नाहीतर माझे सर्व ५० आमदार मुख्यमंत्री आहेत.आमचे सरकार स्थिर आहे.त्याला कोणीही पाडणार नाही.या एकनाथ शिंदे यांच्याकडे खूप नवीन नवीन आहे. आमचे ५० आमदार खूप कलाकार आहेत.विरोधी पक्षांना ते पुरे आहेत, असेही शिंदे यावेळी म्हणाले.शिंदे सरकार येवून पंधरा दिवस उलटूनही मंत्रालय सुरू नसल्याची टीका विरोधकांनी केली आहे.याचाही समाचार मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला.काही लोक म्हणतात,मंत्रालय सुरु नाही मात्र मी जिकडे जाईन तिकडे माझे मंत्रालय आहे.माझे गाडीतूनही काम सुरु आहे. माझ्या हातात लोक पत्र देतात. त्यावर मी लगेच सही करतो.नंदनवन या निवासस्थानी गेलो,ठाण्याला दिघे यांच्या आश्रमात गेलो, त्या ठिकाणीही माझे काम चालूच असते.दररोज सकाळी सात वाजता राज्यातील पूरपरिस्थितीचा आढावा घेत आहे.संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करतो असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांना दिले.