माझ्या शिवसैनिकाचे रक्त सांडले तर खपवून घेतले जाणार नाही : उद्धव ठाकरेंनी ठणकावले

मुंबई नगरी टीम

मुंबई । मी शिवसैनिकांना शांत रहाण्याचे आवाहन केले आहे.मात्र,शांत बसलो याचा अर्थ आम्ही भ्याड आहोत असे नाही असे ठणकावतानाच, माझ्या शिवसैनिकाचे रक्त सांडले तर खपवून घेतले जाणार नाही.यातून काही वेडेवाकडे झाले तर तुम्ही जबाबदार असाल, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला.

काल गुरूवारी रात्री भायखळा विधानसभा संघटक बबन गावकर आणि उपविभाग प्रमुख विजय कामतेकर यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला.हल्लेखोरांनी केलेल्या हल्यात कामतेकर यांच्या गाडीचे नुकसान झाले.या हल्ल्यातून बबन गावकर आणि विजय कामतेकर हे दोघेही बचावले आहेत.या घटनेची माहिती मिळताच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना शाखेत भेट घेऊन कामतेकर याची चौकशी केली.यावेळी शिवसेना नेते दिवाकर रावते, खासदार अरविंद सावंत, आमदार सचिन अहिर, आमदार सुनील शिंदे, उपनेते मनोज जामसुतकर, नगरसेवक रमाकांत रहाटे, शाखाप्रमुख रमेश रावल यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.यावेळी ठाकरे यांनी उपविभागप्रमुख कामतेकर यांच्याकडून संपूर्ण घटनाक्रम जाणून घेतला. त्यानंतर त्यांनी भायखळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक खोत यांना हल्ला झालेल्या शिवसैनिकांना संरक्षण का दिले नाही, असा सवाल केला.कुणी यात राजकारण करत असेल पण तुम्ही राजकारण करू नका. हे राजकरण सुडाचे राजकारण सुरु आहे. मात्र, शिवसैनिकाच्या केसाला जरी धक्का लागला तर शांत बसणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

आम्ही शांत आहोत याचा अर्थ भ्याड आहोत असे नाही.शिवसेनेने काही वेडेवाकडे पाऊल उचलले तर त्याला तुम्ही जबाबदार असाल.तुमच्या उपमुख्यमंत्र्यांना सांगा की तुम्ही संरक्षण करण्यास सक्षम नसाल तर पुढे काय करायचे ते आम्ही पाहू.जे कोणी संशयित आहेत त्यांना लवकरात लवकर ताब्यात घ्या.जनतेचे रक्षक हेच भक्षक झाले तर कसे होणार ? असा सवालही त्यांनी पोलिसांना केला.यानंतर शिवसैनिकांशी संवाद साधताना ठाकरे यांनी सध्या आपण शांत असलो तरी कुणी आपल्या अंगावर आले तर शांत बसू नका. तुम्ही शिवसैनिक आहात हे लक्षात घ्या.जीवाशी येत असेल तर खपवून घेतले जाणार नाही. यापुढे जशास तसे उत्तर देण्याची तयारी ठेवा, असे आदेशही त्यांनी यावेळी शिवसैनिकांना दिले.

Previous article५० पैकी एकही आमदार पडला तर मी राजकारण सोडेन : मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना आव्हान
Next articleजगामध्ये जिथे जिथे हुकुमशाही आली,ती लयास गेली : शरद पवारांचा इशारा