जगामध्ये जिथे जिथे हुकुमशाही आली,ती लयास गेली : शरद पवारांचा इशारा

मुंबई नगरी टीम

नागपूर । जगामध्ये जिथे जिथे हुकुमशाही आली,ती लयास गेली.श्रीलंकेत राष्ट्रपतींच्या घरात सामान्य लोकं घुसली आणि सत्ताधारी कुटुंब देशाबाहेर निघून गेले आहे.त्यामुळे सत्तेचा गैरवापर कुणी करत असेल तर लोकं त्याविरोधात आवाज उठवतात,हे श्रीलंकेत दिसून आले असा इशारा देतानाच भारतातही जे काही घडत आहे, त्याची चिंता न करता आपण एकसंध राहिले पाहिजे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नागपूर येथे केले.

लोकशाही टिकवण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला आदर्श घालून दिला आहे.हा आदर्श टिकवण्यासाठी आपल्याला एका जबरदस्त संघटनेची आवश्यता आहे आणि ती संघटना राष्ट्रवादी काँग्रेस आहे असा आत्मविश्वासही शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नागपूर येथील कार्यकर्ता मेळाव्यास उपस्थित राहून शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले.आम्ही केंद्रसरकारच्या हुकुमशाही विरोधात सातत्याने आवाज उठवत आहोत.त्याची जबरदस्त किंमत आमच्या नवाब मलिक व अनिल देशमुख या दोन सहकाऱ्यांना मोजावी लागली आहे असे सांगतानाच पवार यांनी आज ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे,त्यांनी सत्ता केंद्रीत करुन विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू केला असल्याचा आरोपही केला.

मध्यप्रदेशमध्ये कमलनाथ यांचे राज्य पाडून भाजपचे राज्य आणले.कर्नाटकातदेखील आमिषे दाखवून काँग्रेसचे सरकार घालवले.त्यानंतर महाराष्ट्रात शिवसेनेचे काही लोकांना हाताशी धरून राज्यात चांगले काम करणारे सरकार बाजूला केले.आज ठिकाठिकाणी अधिकारांचा गैरवापर केला जात आहे, दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण हे जास्त काळ चालणार नाही असा स्पष्ट इशाराही शरद पवार यांनी भाजपला दिला. आज दिल्लीत खासदारांसाठी एक अध्यादेश काढण्यात आला आहे. संसदेत काम करत असताना सभागृहात जर खासदारांचे म्हणणे सरकारने ऐकले नाही तर खासदार पुन्हा – पुन्हा आपली बाजू मांडतात.सरकारने लक्ष दिले नाही तर खासदार सभात्याग करुन, बाहेर जाऊन महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर निषेध आंदोलन करतात. हा खासदारांचा लोकशाहीतील अधिकार आहे.पण आता खासदारांना संसदेच्या आवारातही आंदोलन आणि घोषणाबाजी करण्यास बंधन घालण्यात आले आहे याबाबत पवार यांनी नाराजी व्यक्त केली.

विदर्भात आणि विशेषतः नागपूर शहरात आपली शक्ती मर्यादित होती.यासाठी अनिल देशमुख आणि इतर सहकारी प्रयत्न करत होते. पण दुर्दैवाने त्यांच्यावरच संकट आले.तरीही शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष यांनी ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी त्यांना साथ दिली. त्यामुळे इथे पक्षाचे चित्र नक्कीच सुधारेल असा विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केला. मागच्या वेळी आपण कमी जागा लढविल्या होत्या, यावेळी अधिक जागा लढविण्यासंबंधी स्थानिक नेत्यांनी बसून चर्चा करावी. तुमचा जो निर्णय असेल त्याला पक्ष पाठिंबा देईल. पक्षाचा पाया मजबूत करायचा असेल तर विधानसभा निवडणुकीला इथे सामोरे जावेच लागेल असेही पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.नागपूरमध्ये आज भाजपचे वर्चस्व वाढले असले तरी खऱ्या अर्थाने नागपूरच्या लोकांची मानसिकता ही पुरोगामी मानसिकता आहे.स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांविरोधात लढा देण्यासाठी काँग्रेसच्या नागपूरमधील अधिवेशनात ठराव झाला होता. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू त्या अधिवेशनास उपस्थित होते.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीदेखील धर्म परिवर्तनाचा महत्त्वाचा निकाल याच नागपूर शहरात घेतला. त्यामुळे नागपूर शहर हे ऐतिहासिक निर्णय घेण्यासाठी प्रसिद्ध आहे. इथला माणूस गरीब असेल पण तो लाचार नाही. तो एकत्र आला तर अन्यायाच्या विरोधात पेटून उठतो आणि चित्र पालटतो. त्यामुळे आज सबंध राज्य व देशात सत्तेचा गैरवापर होत असताना याविरोधात संघर्ष करण्यासाठी नागपूर कधीही मागेपुढे पाहणार नाही, असा विश्वास पवार यांनी यावेळी व्यक्त केला.

Previous articleमाझ्या शिवसैनिकाचे रक्त सांडले तर खपवून घेतले जाणार नाही : उद्धव ठाकरेंनी ठणकावले
Next articleऔरंगाबादचे ‘संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचे ‘धाराशिव’ नामकरणाची उद्या घोषणा