गोपीनाथ मुंडेंच्या जयंती निमित्त पंकजा मुंडेंनी जाहीर केला ‘सेवेचा संकल्प’

मुंबई नगरी टीम

परळी । भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे या दरवर्षी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीदिनी 12 डिसेंबर रोजी एक संकल्प करत असतात,यंदाही त्यांनी एक आगळा वेगळा संकल्प केला आहे, तो संकल्प ऊसतोड कामगार,कष्टकरी आणि वंचितांच्या सेवेचा आहे,याबाबत त्यांनी स्वत: त्यांच्या फेसबुकवर यासंदर्भात व्हिडीओ शेअर करून कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे.

लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंती दिनी गोपीनाथ गडावर वेगवेगळ्या सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.मात्र यावर्षी ऊसतोड कामगार,कष्टकऱ्यांच्या समवेत एक दिवस राहून मुंडे साहेबांची जयंती साजरी करावी असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले आहे. विशेष म्हणजे स्वतः पंकजा मुंडे या दिवशी ऊसतोड कामगारांसोबत उसाच्या फडावर असणार आहेत.यासंदर्भात एक व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे, त्यात म्हटलं आहे की, यंदा सेवेचा संकल्प करुयात.यावेळी आपण काही वेगळं करुयात.कष्टकरी,मजुरांकडे जा,त्यांची सेवा करा.त्यांना घरातून डबा बनवून न्या आणि खायला घाला, त्यांच्या डब्यातले तुम्ही खा. ज्यांचं मुंडे साहेबांवर प्रेम आहे ते असे कार्यक्रम करतील. आपण केलेल्या उपक्रमाच्या भावना माझ्या सोशल मीडियावर व्यक्त करा.जेव्हा तुम्ही हे काम करत असाल त्यावेळी मी उसतोड कामगारांसोबत हा दिवस घालवणार आहे. हा दिवस कष्टकरी लोकांसाठी साजरा करायचा आहे. हे ज्यावेळी आपण साजरं करू त्यापेक्षा मोठा आनंद कोणताही नाही, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

Previous articleसोमवारपर्यंत कामावर येणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेणार
Next articleशरद पवार वाढदिवशी ‘व्हर्च्युअल रॅली’च्या माध्यमातून शुभेच्छा स्वीकारणार