शरद पवार वाढदिवशी ‘व्हर्च्युअल रॅली’च्या माध्यमातून शुभेच्छा स्वीकारणार

मुंबई नगरी टीम

मुंबई । १२ डिसेंबर रोजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वयाची ८१ वर्ष पूर्ण होत असून कोरोनामुळे यावर्षी शरद पवार हे व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून जनतेच्या शुभेच्छा स्वीकारणार असल्याची माहिती देतानाच त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कुणीही येऊ नये असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राज्यातील जनतेला केले.
ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर व्हर्च्युअल रॅली ही मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत कोरोना नियमांचे पालन करुन रविवार १२ डिसेंबर रोजी नेहरु सेंटर वरळी येथे सकाळी ११ ते १ या वेळेत पार पडणार आहे.वाढदिवसानिमित्त होणारी ही अभूतपूर्व व्हर्च्युअल रॅली पक्षाच्या अधिकृत फेसबुक पेज व युट्यूब चॅनेलवर थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही दरवर्षी पक्षाच्यावतीने नवीन उपक्रमाची घोषणा करत असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. पक्ष संघटना व कार्यकर्ते यांच्यातील समन्वय अधिक सक्षम होण्याकरिता एका महत्वाच्या अ‍ॅपचे उद्घाटन होणार असून विद्यार्थी संघटनेला ‘महाराष्ट्र युथ कार्निवल’ असा आगामी काळाकरीता विशिष्ट कार्यक्रम देण्यात येणार आहे असेही पाटील यांनी सांगितले.
१४ ते २० डिसेंबर या कालावधीत स्वाभिमान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पक्षाची फादर बॉडी, फ्रंटल व सेलच्या विभागामार्फत सभासद नोंदणी कार्यक्रम,आरोग्य,रक्तदान शिबीर, औषध वाटप, वृक्ष लागवड, पर्यावरण विषयक कार्यक्रम, याशिवाय कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन सर्व नागरिकांनी लस घेणे अत्यंत गरजेचे आहे म्हणून कोरोना लस घेण्याबाबत जनजागृती व इतर समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार आहे असेही पाटील यांनी सांगितले.

Previous articleगोपीनाथ मुंडेंच्या जयंती निमित्त पंकजा मुंडेंनी जाहीर केला ‘सेवेचा संकल्प’
Next articleओबीसीचे आरक्षण संपवण्याचे भाजपचे षडयंत्र : छगन भुजबळांचा घणाघात