ओबीसीचे आरक्षण संपवण्याचे भाजपचे षडयंत्र : छगन भुजबळांचा घणाघात

मुंबई नगरी टीम

मुंबई । राजकीय मार्गांनी आरक्षण संपवता येत नाही, त्यामुळे न्यायालयात याचिका करत आरक्षण संपवण्याचे भाजपचे षडयंत्र आहे, असा गंभीर आरोप राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केला. तसेच ओबीसी आरक्षणाला विरोध करणाऱ्या भाजपला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत खड्यासारखे बाजुला करा,असे आवाहन भुजबळ यांनी केले.

वरळी येथील नेहरु सेंटरमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसाचा समारंभ आज पार पडला. त्यावेळी भुजबळ बोलत होते. आम्ही येवला येथे ओबीसी समाजाची रॅली आयोजित केली होती. त्यास तत्कालीन मुख्यमंत्री या नात्याने पवार हजर होते. राज्यात मंडल आयोगाची अंमलबजावी करा,अशी मागणी आम्ही केली. तेव्हा पवार यांनी मंडल आयोग लागू करण्याची घोषणा केली. त्यानंतर महिनाभरात राज्यात ओबीसी आरक्षणाची अंमलबजावणीसुद्धा झाली असे यावेळी भुजबळ म्हणाले.

आरक्षणाचा इतिहास ओबीसी समाजाने विसरता काम नये. ज्यांनी आरक्षण दिले त्या पवार साहेबांच्या मागे समाजाने उभा राहिले पाहिजे, असे सांगत भाजपने ओबीसी समाजाचा विश्वासघात केल्याचा आरोप भुजबळ यांनी केला. ५० टक्केच्या मर्यादेत आरक्षण ठेवण्याचा अध्यादेश काढण्यापूर्वी भाजपबरोबर दोन बैठका झाल्या होत्या. त्यांनी त्यास होकार दिला होता. मात्र परत न्यायालयात जाऊन आडकाठी आणली. भाजपचे जनरल सेक्रेटरी आरक्षणविरोधात न्यायालयात गेले, असा दावा त्यांनी केला.

भाजपवाले बोलतात एक, करतात एक असेही भुजबळ म्हणाले. त्यांना एक एक करुन आरक्षण संपवायचे आहे. राजकीय पद्तीने आरक्षण संपवता येत नाही, म्हणून न्यायालयाचा वापर केला जात आहे. भाजप म्हणजे ‘मुँह में राम बगल में छुरी’ असा प्रकार आहे. भाजपवाल्यांच्या कथनी आणि करणीत अंतर असल्याचे भुजबळ म्हणाले. जागृत व्हा, आपल्या आरक्षण हक्काचे रक्षण करा, असे आवाहन त्यांनी ओबीसी समाजाला केले.

शरद पवार यांची संयमी म्हणून मोठी ख्याती आहे. त्यांना समजून घेण्यासाठी ‘लोक माझे सांगाती’ आणि ‘नेमकीचे बोलणे’ ही दोन पुस्तके कार्यकर्त्यांनी वाचावती, अशी सूचना भुजबळ यांनी केली. राज्यात २०१९ मध्ये जसा राजकीय चमत्कार दिसला, तसा २०२४ मध्ये दिल्लीत दिसेल, असा दावा भुजबळ यांनी केला.

Previous articleशरद पवार वाढदिवशी ‘व्हर्च्युअल रॅली’च्या माध्यमातून शुभेच्छा स्वीकारणार
Next articleपंकजाताईंनी कामगारांसोबत काम केले अन् भाजी – भाकरीही खाल्ली !