मुंबई नगरी टीम
मुंबई । केंद्र सरकारने दूध,दही,तेल,तुप,खाण्यापिण्याच्या पदार्थांसह सर्वच वस्तुंवर जीएसटी लावल्याने त्याचा परिणाम सर्वसामान्यांचा जनतेलाच भोगावा लागणार आहे.जीएसटी,महागाई, बेरोजगारी,अग्निपथ योजना या मुद्द्यांवर काँग्रेस व सहयोगी पक्ष संसदेत आवाज उठवू पाहत आहेत म्हणून विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी खोट्या प्रकरण उकरून काढत सोनिया गांधी यांची ईडीकडून चौकशी केली जात आहे,असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
सोनिया गांधी यांना सलग दुसऱ्या दिवशी ईडीने चौकशीला बोलावल्यामुळे राज्यभर आजही सत्याग्रह करून केंद्रातील मोदी सरकारचा निषेध करण्यात आला.काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईत सत्याग्रह करण्यात आला. ईडी,सीबीआय सारख्या संस्था मोदी सरकारच्या काळात स्वतंत्र राहिलेल्या नाहीत, या संस्थांना मोदी सरकारने बाहुल्या बनवले आहे व ते सरकारच्या इशाऱ्यावर विरोधकांना खोट्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत.संसद अधिवेशन सुरु असल्याने जीएसटी,अग्निपथ योजनेवर काँग्रेस चर्चेची मागणी करत आहे पण मोदी सरकार चर्चेपासून पळ काढत आहे. प्रश्न उपस्थित करणाऱ्या खासदारांना लोकसभा व राज्यसभेतून निलंबित केले जात आहे. सोनिया गांधी व राहुल गांधी जनतेचा आवाज उठवत आहेत म्हणूनच घाबरून केंद्र सरकार त्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत आहे अशी टीका पटोले यांनी यावेळी केली.
केंद्र सरकारच्या अत्याचाराविरोधात काँग्रेस देशभर शांततेत सत्याग्रह करत आहे पण हे आंदोलनही पोलीस बळावर दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी, युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास यांच्यासह ५७ खासदारांना पोलिसांनी दिल्लीत सत्याग्रह करताना ताब्यात घेऊन दिवसभर डांबून ठेवले.भाजपा सरकार हे ब्रिटीश सरकारपेक्षा जास्त अत्याचारी आहे.काँग्रेसने शांततेत सत्याग्रह करून जुलमी ब्रिटीश सत्तेला देशातून पळवून लावले केंद्रातील भाजपा सरकारही पळ काढेल असेही पटोले म्हणाले.सोनिया गांधी आजारी असतानाही चौकशीची नावाखाली त्यांचा छळ केला जात आहे म्हणून केंद्रातील भाजपा सरकारच्या विरोधात दुसऱ्या दिवशीही नवी मुंबई, पुणे, नागपूर, सोलापूर, अकोला, नांदेडसह राज्यात सर्व जिल्हा मुख्यालयी सत्याग्रह करण्यात आला.