मुंबई नगरी टीम
मुंबई । राज्य सरकारने राज्यातील महानगरपालिकेच्या प्रभाग रचना बदलण्याचा निर्णय घेतला आहे.या निर्णयावरून विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य करीत भाजपाच्या दबावाखाली हा निर्णय घेतला असल्याचा आरोप केला आहे.विरोधकांचा हा आरोप चुकीचा असून,एकनाथ शिंदे नगरविकास खात्याचे मंत्री असताना याबाबतचा त्यांच्याच खात्याने घेतलेला निर्णय आता बदलला हे म्हणणे देखील चुकीचे आहे.तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या स्वभावाचा फायदा घेत शिंदे यांचा विरोध डावलून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे शिंदे गटाचे आमदार आणि प्रवक्ते उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुका २०१७ च्या प्रभाग रचनेप्रमाणेच घेण्याचा निर्णय घेतला आहे.या निर्णयवारून विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य करीत मुंबई महापालिकांमध्ये प्रभागरचना बदलण्याचा निर्णय हा भाजपाच्या दबावामुळे घेण्यात आला असा आरोप केला आहे.एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री असताना त्यांच्याच खात्याने आणलेला प्रस्ताव त्यांनी मुख्यमंत्रीपदावर आल्यानंतर बदलला अशीही टीका विरोधकांनी केली होती.विरोधकांच्या या टीकेला आज शिंदे गटाचे आमदार आणि प्रवक्ते उदय सामंत यांनी प्रत्त्युत्तर दिले आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री असताना याबाबतच त्यांच्याच खात्याने घेतलेला निर्णय आता बदलला हे म्हणणे चुकीचे आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री होते तेव्हा त्यांनी शिवसेनेच्या दृष्टीने हा प्रस्ताव नुकसानीचा असल्याचे सांगत या प्रस्तावाला विरोध केला होता.मात्र तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या स्वभावाचा फायदा घेत एकनाथ शिंदे यांचा विरोध डावलून हा निर्णय घेण्यात आला असेही सामंत यांनी स्पष्ट केले.