मुंबई नगरी टीम
मुंबई । ओला दुष्काळ जाहीर करा,अतिवृष्टीग्रस्तांना तात्काळ मदत करा,पन्नास खोके,एकदम ओके,ईडी ज्याच्या घरी तो भाजपच्या दारी,स्थगिती सरकार हाय हाय,आले रे आले गद्दार आले. अशा घोषणा देत अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पाय-यांवर राज्य सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली.
अधिवेशनाच्या आजच्या चौथ्या दिवशीही विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विधानभवनाच्या पाय-यांवर राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पाय-यांवर राज्य सरकारच्या विरोधात निदर्शने करीत सरकारला धारेवर धरण्याचे काम केले.दरम्यान राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजार रुपये आणि फळबागांना हेक्टरी दीड लाखाची मदत द्यायला करावी तसेच राज्यात ओला दुष्काळ जाहीर करायला हवा होता.मात्र सरकारने इतर मागण्यांकडेही दुर्लक्ष केल्यामुळे सरकारचा निषेध करत असल्याचे सांगून विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानसभेत सभात्याग केला.
अतिवृष्टीमुळे शेतजमिनीवरील १८ लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.या शेतकऱ्यांना शेती उभी करायला वेळ लागणार आहे त्यामुळे या शेतकऱ्यांच्या शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करायला हवे होते. मात्र तेही जाहीर केले नाही असे विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले.आदिवासी समाजाला खावटी अनुदान द्यायला हवे होते.मात्र सरकारने तोही निर्णय घेतला नाही. एनडीआरएफच्या निकषातील मदतीबाबत काही धोरणात्मक निर्णय जाहीर केला नाही.शेतक-यांना दुप्पट मदत करण्याचे आश्वासन दिले मात्र प्रत्यक्षात तुटपुंजी मदत जाहीर करण्यात आली.सरकारच्या शेतकरी विरोधी धोरण आम्हाला मान्य नाही असेही पवार यांनी सरकारला ठणकावून सांगितले.अतिवृष्टीत शेतकऱ्यांची जनावरेही वाहून गेली आहेत त्यांचे पंचनामे झालेले नाहीत. एकीकडे शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्याचे सरकार जाहीर करत असतानाच आज शेतकरी वीजेचा शॉक घेऊन किंवा रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करीत असल्याबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.सरकारने आजपासून बाधितांना मदत केली जाईल असे जाहीर करायला हवे होते.मात्र तेही जाहीर केले नाही आता पुढच्या महिन्यात ही मदत देण्याचे जाहीर केले आहे.विदर्भात गोगलगायीच्या आक्रमणाबाबतही अधिका-यांना अजून आदेश दिलेला नाही.ज्या अपेक्षेने आम्ही सरकारकडे बघत होतो त्याने आमचे समाधान झाले नाही म्हणून सभात्याग करत असल्याचे विरोधी पक्षनेते पवार यांनी जाहीर करुन सर्व महाविकास आघाडीचे आमदार सभागृहाबाहेर पडले.