ठाणे तालुक्यातील १४ गावांचा नवी मुंबई महापालिकेमध्ये समावेश

मुंबई नगरी टीम

मुंबई । ठाणे तालुक्यातील १४ गावांचा नवी मुंबई महापालिकेमध्ये समावेश करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार नगरविकास विभागामार्फत त्याबाबत प्राथमिक अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.हद्दवाढीच्या या कार्यवाहीमुळे ठाणे तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणूका डिसेंबर पर्यंत पुढे ढकलण्याची विनंती नगरविकास विभागाने राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.

ठाणे जिल्ह्यातील दहिसर,मोकाशी, वालीवली,पिंपरी, निघू,नावाळी, वाकळण, बामाली, नारीवली, बाळे, नागाव, भंडाली, उत्तरशिव आणि गोटेघर या १४ गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. त्यानुसार याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.राज्य निवडणूक आयोगाने जानेवारी २०२१ ते मे २०२२ कालावधीत मुदत संपणाऱ्या राज्यातील ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहिर केला आहे. मात्र ठाणे तालुक्यातील १४ गावांचा नवी मुंबई महापालिकेमध्ये समावेश करण्याची कार्यवाही सुरू असल्याने त्याबाबत प्राथमिक अधिसूचना जाहिर झाली आहे. ग्रामपंचायत निवडणूकीच्या जाहिर कार्यक्रमानुसार या ग्रामपंचायतींमध्ये निवडणूका झाल्या आणि त्यानंतर हद्दवाढीची कार्यवाही झाल्यास ग्रामपंचायतींचे अस्तित्व संपुष्टात येईल. नव्याने स्थापित नागरी प्राधिकरणांच्या निवडणूका घ्याव्या लागतील परिणामी निवडणूकीवर दुहेरी खर्च होईल.याबाबी विचारात घेता ठाणे तालुक्यात ग्रामपंचायतींच्या निवडणूका डिसेंबर पर्यंत पुढे ढकलण्याची विनंती राज्य निवडणूक आयोगाला केली आहे यासंदर्भात नगरविकास विभागाचे उपसचिव कैलास बधान यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या सचिवांना पत्र पाठविले आहे.

Previous articleदीड लाख रोजगार उपलब्ध करणारा प्रकल्प राजकीय दबावापोटी गुजरातला
Next articleउद्धव ठाकरेंच्या ‘महाप्रबोधन’ यात्रेपूर्वीच एकनाथ शिंदेंची ‘हिंदू गर्व गर्जना’ यात्रा