मुंबई नगरी टीम
मुंबई । शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावर तर शिंदे गटाचा दसरा मेळावा हा बीकेसीच्या मैदानावर होणार असून शिवसेना आणि शिंदे गटाकडून दसरा मेळाव्याची जय्यत तयारी सुरू असून,यानिमित्ताने दोन्ही गटांकडून शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे.शिवतीर्थावर होणारा शिवसेनेचा दसरा मेळावा हा त्यांचा नसून हा दसरा मेळावा हा महाविकास आघाडीचा मेळावा आहे,अशा शब्दात राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी खिल्ली उडवली आहे.
शिवसेनेत झालेल्या बंडाळी नंतर होणारा हा पहिलाच दसरा मेळावा आहे.शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावर तर शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसीच्या मैदानावर होणार आहे.या दोन्ही दसरा मेळाव्याची जय्यत तयारी सुरू आहे.दसरा मेळावा यशस्वी करण्यासाठी शिवसेना आणि शिंदे गटाने कंबर कसली आहे.बीकेसीवर होणा-या मेळाव्याच्या तयारीची पाहणी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली.यावेळी त्यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.शिवतीर्थावर होणारा दसरा मेळावा हा शिवसेनेचा आहे.आता राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून शिवसेनेला मदत मिळत आहे.शिवसेनेचे नेते भारत जोडो अभियानाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसच्या कार्यक्रमाला गेले होते. त्यामुळे शिवसेनेचा होणारा दसरा मेळावा हा शिवसेनेचा नसून महाविकास आघाडीचा मेळावा आहे, अशा शब्दात उदय सामंत यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची खिल्ली उडवली.