मुंबई नगरी टीम
मुंबई । राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी आक्षेपार्ह विधान केल्याने त्यांचे पडसाद राज्यातील विविध भागात उमटले.मंत्री सत्तार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करीत राष्ट्रवादीच्या संतप्त कार्यकर्त्यांनी थेट सत्तार यांच्या शासकीय निवासस्थानी धडक देत तावदानाची तोडफोड केली.शिर्डी येथील राष्ट्रवादीच्या शिबिरात खोक्यावरून सुप्रिया सुळे यांनी टीका केल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना मंत्री सत्तार यांनी हे आक्षेपार्ह विधान केले.मी महिलांचा नेहमीच सन्मान करतो,मी महिलांबाबत एकही शब्द बोललो नाही,मी बोलल्यामुळे महिला भगिनींची मने दुखली असतील तर मी खेद व्यक्त करतो.परंतु मी असे काहीही बोललो नाही असे स्पष्टीकरण कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले.
शिर्डी येथे झालेल्या शिबीरात राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी खोक्यावरून शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचा समाचार घेतला होता.त्यावर माध्यमांशी प्रतिक्रिया देताना शिंदे गटाचे आमदार आणि कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सुळे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले.त्यांच्या या विधानानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले राज्यातील विविध ठिकाणी त्यांनी मंत्री सत्तार यांचे पुतळे जाळत संताप व्यक्त केला.संतप्त कार्यकर्त्यांनी मंत्री सत्तार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत शासकिय निवासस्थानी चाल करून खिडक्यांची तावदाने फोडली.राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी फोर्ट येथील माता रमाबाई आंबेडकर पोलिस स्थानकात मंत्री सत्तार यांच्याविरोधात तक्रार दिली.सत्तार यांचा २४ तासांत राजीनामा न घेतल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मंत्रालयात बसू देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी दिला.औरंगाबाद येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी शिवी देत आक्षेपार्ह विधान केले. शिर्डी येथील राष्ट्रवादीच्या शिबिरात सुळे यांनी ‘शिंदे गटातील आमदारांना ५० खोके मिळाले आहेत, म्हणूनच ते देण्याची भाषा करत आहेत.’असे विधान केले होते. त्याबाबत विचारणा केली असता सुळे यांचा एकेरी उल्लेख करत शिवी देत खोके देऊ असे सांगितले. या वक्तव्यानंतर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या शेजारी असलेल्या या बंगल्यासमोर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करूनही कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या बंदोबस्ताला झुगारत जोरदार आंदोलन केले. सत्तार यांच्या निषेधाच्या घोषणा देत कार्यकर्ते बंगल्यात घुसले. यावेळी केलेल्या दगडफेकीत सत्तार यांच्या बंगल्याच्या काचा फोडल्या.
मंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी केलेले वक्तव्य अत्यंत दुर्दैवी व निषेधार्ह असून महिला लोकप्रतिनिधीविषयी गलिच्छ भाषेत बोलून सत्तार यांनी त्यांच्या मागास मनोवृत्तीचे दर्शन घडवले आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मंत्री जयंत पाटील तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.अब्दुल सत्तार यांनी यापूर्वी देखील अनेक वादग्रस्त वक्तव्ये केलेली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्वरित अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी पाटील यांनी केली आहे.खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करणा-या मंत्री अब्दुल सत्तार यांची २४ तासाच्या आत मंत्रीमंडळातून हकालपट्टी करण्याचा प्रवक्ते महेश तपासे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या पत्रातून दिला आहे.विरोधी पक्ष व सत्ताधारी पक्षामध्ये महाराष्ट्र राज्याच्या राजकीय संस्कृतीचा एक धागा गेली अनेक वर्षे जपण्यात आलेला आहे. यामध्ये विरोधी पक्ष व सत्ताधारी पक्ष यांनी गेली अनेक वर्षे राजकारणापलीकडे जाऊन सौहार्दाचे वातावरण जपले आहे. अशामध्ये आपल्या मंत्रीमंडळातील मंत्री अब्दुल सत्तार यांनी सुळे यांच्याविषयी केलेले वक्तव्य अत्यंत अशोभनीय व असंस्कृत आहे. याचा तीव्र निषेध तपासे यांनी केला आहे.सुळे यांचा अपमान म्हणजे राज्यातील तमाम महिलांचा अपमान आहे त्यामुळे तात्काळ अब्दुल सत्तार यांची हकालपट्टी करावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा निर्वाणीचा इशारा तपासे यांनी दिला आहे.
दरम्यान मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाची दखल महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने घेत पोलीस महासंचालकांकडे सत्तार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.या प्रकरणी चौकशी करून तात्काळ करवाई करण्यात यावी असे राज्य महिला आयोगाने पोलीस महासंचालकांकडे केली असल्याने सत्तार यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.राज्यातील विविध भागात सत्तार यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाल्यावर सत्तार यांनी स्पष्टीकरण देत मी महिलांचा नेहमीच सन्मान करतो,मी महिलांबाबत एकही शब्द बोललो नाही,मी बोलल्यामुळे महिला भगिनींची मने दुखली असतील तर मी खेद व्यक्त करतो.परंतु मी असे काहीही बोललो नाही असे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.
सत्तारांच्या सततच्या वक्तव्यामुळे मुख्यमंत्र्यांची डोकंदुखी वाढली
शिंदे गटाचे आमदार आणि कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सततच्या वक्तव्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डोकेदुखीत वाढ होत असतानाच आज राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.मुख्यमंत्री शिंदे यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेले वक्तव्य गांभीर्याने घेतले आहे.मुख्यमंत्र्यांनी सत्तार यांना फोनवरुन खडे बोल सुनावले असल्याचे समजते. सुप्रिया सुळे यांची माफी मागण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याचे सांगण्यात येते.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्व प्रवक्त्यांची एक बैठक बोलावली आहे.