मुंबई नगरी टीम
मुंबई । बेळगाव सीमाभागात कन्नड रक्षण वेदिके संघटनेने महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ला करून तोडफोड केल्याच्या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.येत्या २४ तासात हल्ले थांबवा अन्यथा पुढच्या ४८ तासात माझ्यासह महाराष्ट्रातील सर्व खासदारांना बेळगावच्या नागरिकांना धीर देण्यासाठी जावं लागेल,असा थेट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कर्नाटक सरकारला दिला आहे.
बेळगाव येथे महाराष्ट्रातील वाहनांवर झालेल्या हल्ल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईतील निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला.सीमाभागात सध्या जे घडत आहे ते पाहिल्यानंतर भूमिका घेण्याची वेळ आली आहे असे वाटत आहे असे पवार यांनी सांगून,संविधानात सर्वभाषिक नागरिकांना अधिकार दिले त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वानदिनी सीमेवर जे घडले ते अत्यंत निषेधार्ह आहे असे त्यांनी स्पष्ट केले.हे प्रकरण गेले काही आठवड्यांपासून एका वेगळ्या स्वरुपात जाणीवपूर्वक चिघळवण्याचा प्रकार सुरू आहे.कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी २४ नोव्हेंबर रोजी अक्कलकोटबाबत विधान केले. त्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी जी भाषा वापरली आहे, त्या पार्श्वभूमीवर सीमाभागात स्थिती गंभीर बनली आहे.सीमाप्रश्नी मला अनेकदा सत्याग्रह करावा लागला आहे.प्रसंगी लाठ्या खाव्या लागल्या.त्यामुळे ज्यावेळी सीमाभागात काही घडते तेव्हा सीमाभागातील लोक माझ्याशी संपर्क साधतात.सध्याची परिस्थितीत चिंताजनक आहे.एकीकरण समितीचे पदाधिकाऱ्यांची चौकशी केली जात आहे. त्यांच्या कार्यालयासमोर पोलिस तैनात करण्यात आले आहेत.महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांची तपासणी करून सीमांची नाकाबंदी केली आहे.१९ डिसेंबर रोजी कर्नाटक विधानसभेचे अधिवेशन होणार आहे.या पार्श्वभूमीवर मराठी भाषिकांवर दहशत निर्माण केली जात आहे, असेही पवार म्हणाले.
माझ्या एका डोळ्याची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. पुढच्या १० दिवसांत दुसऱ्या डोळ्याची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे असे स्पष्ट करीत,आज भूमिका घेण्याची वेळ आली आहे त्यामुळे पत्रकार परिषद घेतली आहे असे शरद पवार यांनी सांगितले.सध्या जो वाद सुरू आहे त्यावर राज्य सरकारने भूमिका घेणे गरजेचे होत मात्र ती घेतली जात नाही अशी टाकीही यावेळी पवार यांनी केली. आज हल्ले झाले त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.येत्या २४ तासात वाहनावरील हल्ले थांबले नाहीत तर एक वेगळी भूमिका घ्यावी लागेल आणि जे होईल त्याला कर्नाटक सरकारचे मुख्यमंत्री जबाबदार असतील, असा इशाराही पवार यांनी यावेळी दिला.या निमित्ताने देशाच्या ऐक्याला धक्का देण्याचे काम केले जात आहे.उद्यापासून संसदेचे अधिवेशन सुरू होते असल्याने राज्यातील खासदारांनी केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घ्यावी.त्यानंतरही भूमिका घेतली गेली नाही तर आम्हाला भूमिका घ्यावी लागेल,असेही पवार म्हणाले. येत्या २४ तासात हल्ले थांबवा अन्यथा पुढच्या ४८ तासात माझ्यासह सर्वांना बेळगाववासियांना दिलासा देण्यासाठी बेळगावला जावे लागेल. संयम ठेवूनदेखील जर हालचाल होते नसेल तर आम्हाला बेळगाववासियांना दिलासा द्यावा लागेल यासाठी भूमिका घ्यावी लागेल, असे पवार यावेळी म्हणाले.