मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना मान खाली घालायला लावेल,अशी कुणाच्या बापाची हिंमत नाही

मुंबई नगरी टीम

नागपूर । कोणत्याही परिस्थितीत आम्ही सीमाबांधवांना वा-यावर सोडणार नाही. महाराष्ट्राच्या इंच-इंच जागेसाठी लढू.महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी आम्ही तसूभरही भागे हटणार नाही.राज्याच्या मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांना मान खाली घालायला लावण्याची हिंमत कोणामध्येही नाही असा सणसणीत इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कर्नाटक सरकारला दिला.

सभागृहाचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा प्रश्न उपस्थित केला.कर्नाटकचे मुख्यमंत्री जाणिवपूर्वक वाद उपस्थित करत आहेत. विधीमंडळात त्यांनी ठराव संमत केला आहे. कर्नाटकला जशास तसे उत्तर दिले पाहिजे. सीमाभागातील मराठी भाषिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहाण्याची आवश्यकता आहे.सीमाबांधवांच्या पाठिशी महाराष्ट्र आहे असा ठराव आज कामकाजात का नाही,असा सवाल पवार यांनी विचारला.माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सीमाप्रश्नाबाबत बघ्याची भूमिका घेऊ नका,असे बजावतानाच हा विषय केंद्रीय गृहमंत्री यांचेकडेच नेला पाहिजे.आपले दायित्व आपण पूर्ण केले पाहिजे अशी सूचना केली.हा विषय इतर कोणत्याही विषयापेक्षा महत्त्वाचा आहे याकडे ठाकरे गटाचे सदस्य भास्कर जाधव यांनी आक्रमकपणे लक्ष वेधले.कर्नाटक सरकार केंद्रीय गृहमंत्र्यांचेही ऐकत नाही. कर्नाटकचे मुख्यमंत्री वाट्टेल ते बोलत असतांना आपले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मान खाली घालून का आहेत, असा सवाल जाधव यांनी केला.यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्री शिंदे हे गुरु गोविंदसिंग यांचे शाहिद पुत्र यांच्या वीर दिनी प्रित्यर्थ दिल्लीस गेले आहेत. या राज्याच्या मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री यांना मान खाली घालायला लावेल, अशी कुणाच्या बापाची हिंमत नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले.सीमाप्रश्न संबंधी प्रस्ताव उद्या सभागृहात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

Previous articleउद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेतील पहिल्याच भाषणात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची केली गोची
Next articleमहाराष्ट्राच्या अभिमान,स्वाभिमान,अस्मितेला धक्का; कर्नाटकला ‘जशास तसे’ उत्तर द्या