मुंबई नगरी टीम
मुंबई । आपापसातील मतभेद संपवा,दोन पावले मागे या,पक्ष एक नंबरवर न्यायचा असेल तर मागेपुढे हे घ्यावेच लागेल असा सल्ला राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला.महाराष्ट्राला ५० वर्षे पुढे नेण्याचे काम शरद पवार केले. शिवाय राज्याच्या आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिकाही बजावली अशा शब्दात अजित पवार यांनी शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा ८२ वा वाढदिवस यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आज पक्षाच्यावतीने साजरा करण्यात आला.यावेळी आपल्या भाषणात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मार्गदर्शन केले.यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर दूरदृष्टी असलेला मुख्यमंत्री म्हणून पवार यांच्याकडे पाहिले गेले आहे. पवार यांची दूरदृष्टी ठेवत यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने वास्तू उभी करायची कल्पना आणली ती सत्यात उतरवली हेच त्यांच्या कामाचे गमक आहे असेही पवार म्हणाले.आपापसातील मतभेद संपवा,दोन पावले मागे या,पक्ष एक नंबरवर न्यायचा असेल तर मागेपुढे हे घ्यावेच लागेल असा सल्लाही अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांचे बोट धरुन राजकारणात पुढे आल्याचे सांगतात त्यांचा तो मनाचा मोठेपणा आहे मात्र त्यांच्या मनात पवारसाहेबांबद्दल असलेले स्थान लक्षात घेतले पाहिजे हेही अजित पवार यांनी आवर्जून सांगितले. दरम्यान येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये आपल्या विचारांचे पवारसाहेबांच्या विचाराचे लोक निवडून कसे येतील असा निश्चय करुया असे आवाहनही त्यांनी यांनी यावेळी केले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला तर शिवनेरीवर झाला. तिथले खासदार अमोल कोल्हे आहेत. रायरेश्वरवर शपथ घेतली तो किल्ला भोरमध्ये येतो तिथल्या खासदार सुप्रिया सुळे आहेत. प्रतापगडावर अफजलखानाचा कोथळा शिवाजी महाराजांनी काढला तो किल्ला खासदार श्रीनिवास पाटील यांच्या मतदारसंघात आहे तर हिंदवी स्वराज्याची राजधानी रायगड स्थापन केली ती राजधानी खासदार सुनिल तटकरे यांच्या मतदारसंघातच आहे आणि हे सर्व खासदार राष्ट्रवादीचे आहेत हेही अजित पवार यांनी सांगितले.