मुंबई नगरी टीम
मुंबई । जोगेश्वरी येथील एका पंचतारांकित हॉटेलच्या कथित भूखंड घोटाळ्यावरून ईडी चौकशीचा ससेमिरा मागे लागलेले शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार आणि माजी राज्यमंत्री रवींद्र वायकर हे शिवसेनेत ( शिंदे गटात ) प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.मुख्यमंत्री शिंदे यांचा उद्या शुक्रवारी वाढदिवस असून, या वाढदिवसाचे निमित्त साधून रविंद्र वायकर शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे.ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही पक्षांतरासाठी वायकर यांच्यावर दबाव आणला जात असल्याचा आरोप केला आहे.
शिवसेना पक्षप्रमुख ( उबाठा ) उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू अशी ओळख असलेले जोगेश्वरीचे आमदार रविंद्र वायकर हे गेल्या काही दिवसांपासून ईडीच्या फेऱ्यात सापडले आहेत. जोगेश्वरी पुर्वेतील एका भूखंड घोटाळ्याप्रकरणी ईडीने रविंद्र वायकर यांच्या निवासस्थावासह त्यांच्या ताब्यात असलेल्या मातोश्री क्लबवर धाडी टाकल्या होत्या. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून वायकर यांची चौकशी करण्यात आली आहे. रविंद्र वायकर यांच्यासह त्यांच्या पत्नी मनीषा वायकर आणि त्यांचे भागीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळेच आमदार वायकर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे.ईडीच्या फेऱ्यात सापडलेल्या वायकर यांनी काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांची गुप्तपणे भेट घेतली असल्याची जोरदार चर्चा आहे. उद्या शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस असून,या निमित्ताने वायकर यांचा पक्ष प्रवेश घडवून ठाकरे यांना मोठा धक्का देण्याची तयारी शिंदे गटाने केली आहे.वायकर यांच्यासोबत त्यांच्या विभागातील अनेक शाखाप्रमुख,माजी नगरसेवक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे समजते.दरम्यान वायकर यांच्यावर पक्ष सोडण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.