भाजपचे १९ नगरसेवक बंडाच्या तयारीत ? भाजपचे नेते म्हणाले, या तर “पुंग्या”

मुंबई नगरी टीम

पुणे : पुणे महापालिकेतील भाजपचे १९ नगरसेवक हे बंडाच्या तयारीत असून लवकरच ते महाविकास आघाडीत प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या जोर धरू लागली आहे. महापालिकेत पद न मिळाल्याने नाराज १९ नगरसेवक हे भाजपला रामराम ठोकणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. परंतु या वृत्तामध्ये तथ्य नसून निव्वळ अफवा असल्याचे भाजप नेते सांगत आहेत. १९ नगरसेवक पक्ष सोडण्याच्या वृत्ताला फेटाळून लावत कुणी कुठेही जाणार नसल्याचे भाजप नेत्यांनी म्हटले आहे.

भाजपचे खासदार गिरीश बापट यांना यासंदर्भात विचारले असता त्यांनी या वृत्ताचे खंडन केले आहे. कोणीही पक्षातून बाहेर जात नाही आहे. या सगळ्या अफवा असल्याचे गिरीश बापट यांनी स्पष्ट केले.नगरसेवकांमध्ये नाराजी नाही आणि असेल तर त्यांच्याशी चर्चा करून नाराजी दूर करू, असेही बापट यांनी सांगितले. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी हे सर्व खोटे असल्याचे म्हणत, या चर्चेत काही तथ्य नाही, असे स्पष्ट केले आहे. सर्व नगरसेवकांना संधी मिळाल्या आहेत. निधी मिळाला नाही असेही काही नाही. नगरसेवकांमध्ये नाराजी नसून सर्वांना एकत्र घेऊन काम करत आहोत,असे मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले.

दरम्यान,विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील नगरसेवकांच्या चर्चेवर भाष्य केले आहे. निधी न मिळाल्याने पुण्यात नगरसेवक नाराज असल्याची चर्चा आहे या पत्रकाराच्या प्रश्नावर उत्तर देत फडणवीस म्हणाले, असल्या चर्चा तुमच्याकडेच होतात. माध्यमांकडून अशा पुंग्या सोडल्या जातात. कुणीही भाजपमधून बाहेर जाणार नसून उलट आमच्याकडेच काही लोक येणार असल्याची माहिती फडणवीसांनी दिली. त्यामुळे या बातम्या देणे थांबवा, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले. महापालिकेत पद न मिळाल्याने आणि मतदारसंघासाठी निधी उपलब्ध होत नसल्याची तक्रार भाजप नगरसेवकांनी केली होती. त्यामुळे नाराज नगरसेवक हे बंडाच्या तयारीत असल्याची चर्चा होती. अखेर या चर्चेला भाजप नेत्यांनी पूर्णविराम देत यात तथ्य नसल्याचे स्पष्ट केले. शिवाय भाजपमध्येच इनकमिंग होणार असल्याचे संकेत देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

Previous articleतुम्ही ग्रामपंचायत निवडणूक लढवली आहे का ? मग ही बातमी नक्की वाचा
Next articleआज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ठाकरे सरकारने घेतले ‘हे’ महत्वाचे निर्णय