नगरसेवकांची संख्या वाढली; वाचा : कोणत्या महापालिकेत किती असतील नगरसेवक

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यात वाढलेली लोकसंख्या आणि नागरी विकास योजनांचा वेग वाढविण्याची गरज लक्षात घेऊन राज्य सरकारने महापालिका आणि नगरपालिका सदस्यांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेतला.मुंबई वगळता राज्यातील सर्व महापालिका व नगरपालिकांमध्ये नगरसेवकांची संख्या वाढणार आहे. राज्य मंत्रीमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

राज्य मंत्रीमंडळाच्या निर्णयानुसार महापालिकेतील सदस्य संख्या किमान ६५ तर कमाल १७५ इतकी असेल. नगरपालिकेसाठी ही सदस्य संख्या किमान १७ तर कमाल ६५ इतकी असणार आहे. नगरसेवकांची संख्या वाढल्याने राजकीय पक्षांना आगामी निवडणुकीत जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना उमेदवारी देणे शक्य होणार आहे.सध्या २०११ च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार महापालिका आणि नगरपालिकेतील नगरसेवकांची संख्या निश्चित आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे २०२१ मध्ये केंद्र सरकारला जनगणना करता आली नाही. या जनगणनेला आणखी काही कालावधी लागणार आहे. हे लक्षात घेऊन राज्य सरकारने लोकसंख्या वाढीचा सरासरी वेग गृहीत धरून अधिनियमात नमूद केलेल्या महापालिका आणि नगरपालिकांच्या किमान सदस्य संख्येत १७ टक्के इतकी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

महापालिकेत ३ लाखापेक्षा अधिक आणि ६ लाखापर्यंत लोकसंख्येसाठी निवडून आलेल्या सदस्यांची किमान संख्या ७६ तर कमाल संख्या ९६ पेक्षा अधिक असणार नाही. ६ लाखापेक्षा अधिक आणि १२ लाखापर्यंतच्या लोकसंख्येसाठी निवडून आलेल्या सदस्यांची संख्या किमान ९६ तर कमाल १२६ इतकी असेल. १२ लाखापेक्षा अधिक आणि १४ लाखापर्यंत लोकसंख्येसाठी निवडून आलेल्या पालिका सदस्यांची किमान संख्या १२६ तर कमाल १५६ पेक्षा अधिक नसेल.

कोणत्या महापालिकेत किती असतील नगरसेवक :

महापालिका पूर्वीचे नगरसेवक वाढीव नगरसेवक
परभणी –     ६५ – ७६
चंद्रपूर –       ६६ – ७७
अहमदनगर – ६८- ७९
लातूर –        ७० – ८१
धुळे –          ७४ – ८५
जळगाव –     ७५ – ८६
सांगली –       ७८- ८९
उल्हासनगर – ७८- ८९
पनवेल –        ७८ – ८९
अकोला –       ८० – ९१
कोल्हापूर –     ८१ – ९२
नांदेड –         ८१ – ९२
मालेगाव –      ८४ – ९५
अमरावती –    ८७ – ९८
भिवंडी –        ९० – १०१
मिरा भाईंदर – ९५- १०६
सोलापूर –      १०२ – ११३
नवी मुंबई –    १११- १२२
औरंगाबाद –   ११५ – १२६
वसई विरार –  ११५ – १२६
नाशिक –       १२२ – १३३
कल्याण डोंबिवली -१२२ – १३३
पिंपरी चिंचवड – १२८-१३९
ठाणे – १३१- १४२
नागपूर – १५१ -१५६
पुणे – १६२- १७३

महत्वाचे निर्णय :
१) २४ लाखापेक्षा अधिक व ३० लाखापर्यंत लोकसंख्येसाठी निवडून आलेल्या पालिका सदस्यांची किमान संख्या १५६ व अधिकत्तम संख्या १६८ पेक्षा अधिक नसेल.
२) ३० लाखापेक्षा अधिक लोकसंख्येसाठी निवडून आलेल्या पालिका सदस्यांची किमान संख्या १६८ व अधिकत्तम संख्या १८५ पेक्षा अधिक नसेल.
३) अ वर्ग नगरपरिषदांमध्ये निवडून आलेल्या परिषद सदस्यांची किमान संख्या ४० व अधिक संख्या ७५ हून अधिक नसेल.
४) ब वर्ग नगरपरिषदांमध्ये निवडून आलेल्या परिषद सदस्यांची किमान संख्या २५ व अधिक संख्या ३७ हून अधिक नसेल.
५) क वर्ग नगरपरिषदांमध्ये निवडून आलेल्या परिषद सदस्यांची किमान संख्या २० व अधिक संख्या २५ हून अधिक नसेल.
६) राज्यात मुंबईसह २७ महानगरपालिका आणि ३७९ नगरपालिका, नगरपंचायती आहेत.पैकी निम्म्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पुढच्या वर्षी निवडणुका आहेत.
७) ३० ऑक्टोबर पर्यंत नगरसेवक वाढीचा निर्णय घ्यावा, अन्यथा त्यापुढे निर्णय केल्यास स्वीकारला जाणार नाही,अशी राज्य निवडणुक आयोगाने नगरविकास विभागास तंबी दिली होती. त्यामुळे घाईने आज निर्णय घेण्यात आला.

Previous articleसमीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी केला खळबळजनक आरोप
Next article…तर मंत्रिपदाचा राजीनामा ;कॅबिनेट मंत्र्यांनी दिले आव्हान