मुंबई नगरी टीम
मुंबई । पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी दुरध्वनीवरून चर्चा केल्यानंतर नाराजी दूर झालेले काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोदी आणि शाह मुख्यमंत्रीपदाबाबत जो निर्णय घेतील त्याला समर्थन देण्याची भूमिका जाहीर केली.मात्र हे जाहीर करीत असतानाच त्यांनी अजून मुख्यमंत्रीपदावरचा दावा सोडला नसल्याचे अप्रत्यक्षरित्या नमूद केले.उद्या गुरूवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या समवेत एकनाथ शिंदे,देवेंद्र फडणवीस आमि अजित पवार यांची बैठक होत असून या बैठकीत मुख्यमंत्रीपदकोण होणार यावर शिक्कामोर्तब करण्यात येईल.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा जनाधार मिळाला असला तरी चार दिवस उलटून गेले असले तरी मुख्यमंत्रीपदाबाबत निर्णय न झाल्याने अनेक चर्चांना उधाण आले होते.मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान व्हावे अशी इच्छा भाजपाची असली तरी पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळत नसल्याने काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा होती.आज शिंदे यांनी ठाण्यातील आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका जाहीर केली.मुख्यमंत्रीपदाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जो निर्णय घेतील त्याला समर्थन देणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.हे सांगतानाच त्यांनी महायुतीच्या नेत्याच्या नावाला पाठिंबा असेल असे सांगत त्यांनी अद्यापही मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडला नसल्याचे अप्रत्यक्षरित्या नमूद केले.महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण असेल यावर चर्चा करण्यासाठी उद्या गुरूवारी दिल्लीत पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री शाह यांच्यासमवेत महायुतीच्या राज्यातील नेत्यांची महत्वपूर्ण बैठक होत आहे. या बैठकीला काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार यावरुन संभ्रम निर्माण झालेला असताना एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना दुरध्वनी करून चर्चा केली.सरकार बनवताना,निर्णय घेताना माझ्यामुळे अडचण होईल असे मनात आणू नका.तुम्ही आम्हाला मदत केली. अडीच वर्षं तुम्ही राज्याचा विकास करण्याची,उद्योगधंदे आणण्याची संधी दिली आहे. तुम्ही निर्णय घ्या.तुमचा निर्णय महायुती, एनडीएचे प्रमुख म्हणून जसा भाजपासाठी अंतिम असतो तसा आम्हालाही अंतिम आहे. तुम्ही निर्णय घेताना एकनाथ शिंदेंची अडचण आहे असे मनात आणू नका असे शिंदे यांनी सांगितले.उद्या गुरूवारी दिल्लीत महायुतीच्या नेत्यांची बैठक पार पडल्यानंतर भाजपाचा विधिमंडळ नेता ठरविण्यासाठी भाजपाचे निरीक्षक मुंबईत येवून भाजपाच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक घेणार आहेत.या बैठकीनंतर राजभवनावर जावून महायुतीकडून सत्तास्थापनेचा दावा केला जाईल. त्यामुळे नव्या सरकारचा शपथविधी होण्यास येणारा आठवडा उजडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.