मुंबई नगरी टीम
मुंबई: राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यातील वाढत्या जवळिकीचे रूपांतर निवडणुकीतील युतीत होण्याची शक्यता अपेक्षेप्रमाणे व्यक्त केली जात आहे. राज ठाकरे यांच्या मनसेला तीन जागा सोडण्यावर दोन्ही पक्ष चर्चा करत असून दोन जागा सोडण्याबाबत राष्ट्रवादी सकारात्मक आहे.मुंबई,ठाणे आणि नाशिक या तीन जागांसाठी मनसेने मागणी केली आहे.परंतु ठाण्याच्या जागेबाबतच राष्ट्रवादी अनुकूल आहे.
मोबदल्यात मनसे कॉंग्रेस राष्ट्रवादी आघाडीला मदत करणार आहे.राष्ट्रवादीने आपल्या सर्व उमेदवारांची यादी तयार केली आहे.ठाण्याच्या जागेबाबतच निर्णय झालेला नसून ती जागा मनसेला सोडण्यात येईल,अशी माहिती मिळते.गेल्या अनेक महिन्यांपासून शरद पवार आणि राज ठाकरे यांच्यात जवळीक वाढत असल्याची चिन्हे दिसत होती.पवारांची प्रकट मुलाखत राज ठाकरेंनी घेतली.नंतर औरंगाबाद ते मुंबई एकत्र विमान प्रवासही केला.आणि रविवारी राज ठाकरे यांच्या मुलाच्या लग्नासाठी अख्खे पवार कुटुंब हजर होते.
मनसेने राष्ट्रवादीबरोबर युती केल्यास मुंबईत मनसेला फारसा फायदा होणार नाही.मुंबईत राष्ट्रवादीची ताकदच जास्त नाही.पण इतर महाराष्ट्रात मनसे भाजप किंवा शिवसेनेच्या मतांची फोडाफोड करू शकते.ही युती विधानसभेलाही राहिल्यास भाजप शिवसेनेला मोठा फटका बसेल.कारण विधानसभेचा जय पराजय फार थोड्या मतांनी ठरतअसतो. मनसेने अखेर राष्ट्रवादीला टाळी दिली असून राष्ट्रवादीनेही टाळीनेच प्रतिसाद दिल्याचे सध्या तरी चित्र आहे.